‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे राज्यात ‘समर युथ समिट’चे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

कुठे -      सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, बावधन, पुणे
कधी -    ४ जून ते ६ जून २०१७
केव्हा -     सकाळी १० ते सायंकाळी ६
संपर्क -     पुणे  ९८८१५०४४९२

पुणे - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन. मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखवण्याचा उमेदीचा काळ. शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क-‘यिन’ या व्यासपीठाच्या माध्यमातून राज्यात अकरा ठिकाणी २३ मे ते १२ जून २०१७ पर्यंत कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नागपूर, सातारा, अकोला, पुणे, जळगाव, मुंबई, औरंगाबाद आणि नांदेडमध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सलग तीन दिवसांचे ‘चला, घडूया देशासाठी’ या नावाने ‘यिन समर युथ समिट’चे आयोजन 
केले आहे.

 तरुणाईला उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करून ऊर्जा देण्यासाठी व तरुणांनी स्वतःला घडवतानाच देशालाही घडवावे, या हेतूने स्वतःचा शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकास व्हावा म्हणून हे ‘समर यूथ समिट’ मोलाची भूमिका बजावणार आहेत. तरुणांमधील सळसळत्या उत्साहाला दिशा देण्यासाठी ‘यिन’ राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहे. ‘यिन’ने गेल्या दोन वर्षांपासून शिबिरांचे आयोजन सुरू केले आहे. राज्यात पूर्वी झालेल्या शिबिरांत अण्णा हजारे, हनुमंत गायकवाड, विश्‍वास नांगरे पाटील, महेश झगडे, वैशाली सामंत, सयाजी शिंदे अशा अनेक मान्यवरांनी तरुणाईला मार्गदर्शन केले आहे. 

यंदाच्या समर यूथ समिटमध्ये राज्यातील तज्ज्ञ मंडळी तरुणाईशी संवाद साधणार आहेत. यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्थेसह तीन दिवसांत जेवण, शिबिर किट, बॅच आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सलग तीन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत तीन सत्रांत ते होईल. 

सक्‍सेसफुल बिझनेस, टीम बिल्डिंग, युवा व राजकारण, सेलिब्रेटींशी संवाद, डिजिटल व ऑनलाइन मार्केटिंग आणि सायबर क्राइम, ऑनलाइन बॅंकिंग, स्टार्टअप- द नेक्‍स्ट बिग थिंग, इमेज बिल्डिंग, आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद, क्रीडा व करिअरविषयी मार्गदर्शन, प्रेझेंटेशन स्किल्स अशा विविध विषयांवर विविध सत्र होतील. यात देश-विदेशातील तज्ज्ञ मार्गदर्शक तरुणाईशी संवाद साधणार आहेत. यातून प्रत्येकाला नवी प्रेरणा आणि दिशा मिळणार आहे. यात सहभागासाठी ‘यिन’ सदस्यांना दोनशे रुपये आणि इतर विद्यार्थ्यांना चारशे रुपये प्रवेश शुल्क असेल. चला तर मग आजच नोंदणी करूया...!

Web Title: Summer Youth Summit by YIN