esakal | बारामतीतील या गावाने कोरोना रोखण्यासाठी घेतलाय मोठा निर्णय  
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

सुपे गाव अद्याप कोरोनामुक्त आहे. मात्र, शेजारील गावात कोरोनाबाधित आढळल्याने काळजी घेण्याच्या दृष्टीने गाव बंद ठेवण्याचा निर्णय

बारामतीतील या गावाने कोरोना रोखण्यासाठी घेतलाय मोठा निर्णय  

sakal_logo
By
जयराम सुपेकर

सुपे (पुणे) : बारामती तालुक्यातील सुपे गाव अद्याप कोरोनामुक्त आहे. परंतु, गावाच्या उंबरठ्यावर कोरोना आल्यामुळे गुरूवारपासून सहा दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. सुप्याचा आजचा आठवडेबाजारही खबरदारी म्हणून भरला नाही.

बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यांच्या सिमेवरील सुपे हे मध्यवर्ती बाजार पेठेचे गाव आहे. तीनही तालुक्यांच्या परिसरातील सुमारे २५- ३० गावातील नागरिकांची वर्दळ सुप्यात असते. ग्रामपंचायत, प्रशासन, आरोग्य, पोलिस, अंगणवाडी, ग्रामदुतांनी कोरोनाबाबत जनजागृती करून वेळीच खबरदारी घेतल्याने सुपे गाव अद्याप कोरोनामुक्त आहे. मात्र, शेजारील गावात कोरोनाबाधित आढळल्याने काळजी घेण्याच्या दृष्टीने गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसचिवालयाच्या सभागृहात प्रमुख ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील हे शहर तीन दिवसांसाठी सील

या बैठकीत बंदचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. गुरूवारपासून गावातील दवाखाना, औषध दुकाने आणि पीठ गिरणी चालू असेल. बाकी सर्व प्रकारची दुकाने, व्यवसाय ३० जूनपर्यंत बंद राहतील, अशी माहिती विलास धेंडे, दादा पाटील- कुतवळ, अनिल हिरवे यांनी दिली. या बैठकीला कैलास हिरवे, शरद धेंडे, मल्हारी खैरे, महेबुब शेख आदी उपस्थित होते.

सकाळमुळे वेटलिफ्टर खेळाडू सारिका शिनगारे हिला मिळाला मदतीचा हात

सुपे बाजारपेठेत सध्या गर्दी वाढली असून, सामाजिक अंतर पाळले जात नाही. अनेकजण मास्क वापरत नाहीत. संबंधित दुकानदारांनीही काळजी घेण्याची गरज आहे. बंद काळात ग्रामस्थांनी महत्वाच्या कामाशिवाय गावाबाहेर जाऊ अथवा येऊ नये. बंदबाबत गावातून आज दवंडी देण्यात आली. बंदला व्यापारी व गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.  

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सॅनिटायझरची आवश्यकता असलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे नोंदणी केल्यास प्रति लिटर शंभर रूपयांप्रमाणे सोमेश्वर साखर काऱखान्याकडून सॅनिटायझर उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी डी. जी. लोणकर यांनी दिली.