‘सुपर मॉम’चे स्वप्न पडले महागात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

गुन्हा दाखल कुठे करायचा?
लोणीकंद पोलिसांनी जिथे फसवणूक झाली, तिथे गुन्हा नोंदविण्यास सांगितले. मात्र, वाघोली येथे त्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर या महिलांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, ही निव्वळ फसवणूक असल्याने सायबर पोलिसांनी त्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठविले. स्पर्धक महिला व त्यांचे कुटुंब दोन दिवस गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करीत होते.

चार राज्यांतील ४४ महिलांना २५ ते ५० हजारांना ऑनलाइन गंडा
पुणे - ‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेत सहभागी होऊन देशभर सौंदर्यवती म्हणून चमकण्याचे स्वप्न चार राज्यांतील ४४ महिलांना चांगलेच महागात पडले. संयोजकांनी या महिलांना २५ ते ५० हजारांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा, बंगळुरू, अहमदाबाद या शहरांमधील एक ते दीड वर्षाची मुले असणाऱ्या ४४ महिलांची फोनवरून मुलाखत घेऊन संयोजकांनी अंतिम फेरीसाठी निवड केली. तसेच, त्यांच्याकडून स्पर्धेचे शुल्क म्हणून २५ ते ५० हजार रुपये ऑनलाइन घेतले. तुहीन दास व त्याची बहीण तनुश्री दास हे दोघे स्पर्धेचे मुख्य संयोजक होते. त्यांनीच स्पर्धक महिलांशी फोनद्वारे संपर्क साधला. संबंधित महिलांकडून त्यांचे व्हिडिओ मागवून त्यांची फेसबुकवर जाहिरात केली. अंतिम फेरी पुण्यातील ॲमनोरा पार्कमध्ये रविवारी होणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. या महिलांची दोन दिवसांपूर्वी वाघोली येथील हॉटेल मेपलमध्ये तयारी करून घेण्यात आली. तसेच, स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या स्पर्धक महिलांच्या नातेवाइकांकडून दोन ते पाच हजार रुपये घेऊन त्यांना पास देण्यात आले. दरम्यान, रविवारी ठरल्याप्रमाणे स्पर्धक व त्यांचे नातेवाईक स्पर्धेच्या ठिकाणी आले. मात्र, तेथे ना स्पर्धा होती, ना संयोजक. तुहीन व तनुश्री दास हे दोघे स्पर्धेपूर्वीच तेथून निघून गेले होते. आपली फसवणूक झाल्याचे स्पर्धकांच्या लक्षात आले.

माझी फोनवर मुलाखत घेऊन अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. संयोजकांनी माझ्याकडून ३० हजार रुपये ऑनलाइन घेतले. दोन दिवसांपूर्वी वाघोलीतील मेपल हॉटेलमध्ये आम्हाला ठेवले. परंतु, त्यानंतर संयोजकांनी अंतिम फेरीकडे पाठ फिरवली. 
- स्पर्धक महिला, भोसरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Super Mom Dream Cyber Crime Cheating