सुप्रिया सुळेंनी शब्द पाळला; वृंदावन गार्डनच्या धर्तीवर पुण्यात साकारणार भव्य गार्डन!

Supriya-Sule
Supriya-Sule

खडकवासला (पुणे) : लोकसभा निवडणुकीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील जनतेला दिलेला शब्द पाळला असून खडकवासला धरणाच्या भिंतीलगत भव्य उद्यान उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. धरणाच्या भिंतीलगत मोकळ्या जागेत उभारलेली आकर्षक बाग बघायला पुणेकरांना यापुढे म्हैसूर किंवा अन्य कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. कारण, वृंदावन गार्डनच्या धर्तीवर अत्यंत आकर्षक आणि भव्यदिव्य अशी बाग खडकवासल्यात साकारली जाणार आहे. यासाठीच्या निविदा प्रक्रियेलादेखील सुरवात झाली आहे. 

धरणातील प्रचंड जलसाठा, पाण्यालगतच्या जागेत चौपाटी सदृष्य झाड-झाडोरा, खाद्यपदार्थांची रेलचेल आणि खालील बाजूस भिंतीलगत रंगीबेरंगी फुलांनी डवरलेली बाग, त्यात हजारो प्रकारची, फुले, आकर्षक वेली, झुडपे, अमयुजमेंट पार्क, रंगीत दिव्यांची आकर्षक संगीतमय कारंजी आणि अन्य अनेक सुविधा असलेले ठिकाण पहायचे तर म्हैसूरच्या वृंदावन गार्डनला भेट द्यावी लागते. तेथील कृष्णराजसागर धरणाच्या भिंतीलगत मोकळ्या जागेत ही बाग उभी आहे. अशीच एक छोटीशी बाग पैठणच्या नाथसागर धरणालगत सुद्धा आहे. याच धर्तीवर आता पुण्यात अशी भव्य म्हणजे तब्बल २८ एकर जागेवर ही बाग साकारण्यात येणार आहे. 

गेल्या वर्षी खासदार सुप्रिया सुळे खडकवासला विधानसभा मतदार संघात दौऱ्यावर असताना धरणाच्या भिंतीलगत असलेल्या या मोकळ्या जागेचे बागेत रूपांतर करण्याबाबत चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी त्र्यंबक मोकाशी यांनी दिली. ही संपूर्ण जागा जलसंपदा पाटबंधारे विभागाच्या मालकीची असून बाग सुद्धा त्यांनीच विकसित करावी, अशी सूचना सुळे यांनी मांडली होती.

सध्या ही जागा रिकामी असून खासकवासला ते उत्तम नगर हा धरणाखालील रस्ता येथून जातो. मोकळा रस्ता, वर्दळ कमी त्यामुळे या भागात मद्य पार्ट्यांपासून अनेक अवैध प्रकार होत असल्याचे बोलले जाते. हे प्रकार टाळण्यासाठी आणि स्थानिक सात ते आठ गावांचा वाड्यावस्त्यांचा विकास साधू शकेल, अशी कल्पना सुळे यांनी जलसंपदा विभागाकडे मांडली होती. लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्या वचननाम्यात सुद्धा त्यांनी याबाबत आश्वासन दिले होते.

याबाबत गेल्या वर्षी १० जुलै २०१९ रोजी पाटबंधारे विभागाशी प्रथम पत्रव्यवहार करून बैठकही झाली. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजेंद्र मोहिते, संजीव चोपडे, विजय पाटील यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन या जागेची पाहणीही केली आहे. दरम्यानच्या काळात गतवर्षी निवडणूक होऊन राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आल्यावरही सुळे यांचा या बागेसाठी पाठपुरावा सुरूच होता. चालू वर्षी १८ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांनी पुन्हा पत्र पाठवून या बागेविषयी आठवण करून दिली. खुद्द जयंत पाटील यांनाही एक निवेदन दिले. त्याबाबत माहिती देण्यात आली. अखेर दोन दिवसांपूर्वी या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून टेंडर प्रक्रियाही सुरू झाली आहे. सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून पुणेकरांसाठी एक अत्यंत देखणी बाग याठिकाणी साकारणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

असा आहे, प्रस्तावित आराखडा
एकूण २८ एकरामध्ये धरणाच्या भिंतीलगत मोकळ्या जागेत मुख्य बाग, धरणाच्या दोन्ही बाजूस रस्त्यालगत उपबागा, मुख्य बागेत अँयुजमेंट पार्क, वस्तू संग्रहालय, आकर्षक मत्स्यदर्शन केंद्र, संगीतमय कारंजी, हॉटेल्स, रोसॉर्ट, बहुउद्देशीय सभागृह, उत्तमोत्तम फुलझाडे, वृक्षराजी, स्थानिक झाडे, वेली अशी ही बाग साकारली जाणार आहे. या बागेमुळे खडसकवासला धरणालगत एक सर्वोत्तम आणि भव्य अशा आकाराचे पर्यटन केंद्र उभे राहणार आहे. या प्रकल्पामुळे खडकवासलाच नाही, तर धरणाच्या आजूबाजूस असलेल्या किमान दहा ते बारा गावांतील स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे श्रेय सुप्रिया सुळे यांचे आहे, असे त्र्यंबक मोकाशी यांनी सांगितले.

याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले की, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या परिसरात पर्यटनासाठी मोठी संधी असल्यामुळे महामंडळाच्या रिकाम्या जागेचा वापर करून महामंडळाला जास्तीचा महसूल मिळवण्याचा प्रयत्न आहे. येथील 28 एकर जागा पर्यटन विकासासाठी देणार आहे. निविदा प्रक्रिया स्विस पद्धतीने राबवली जाणार आहे. महामंडळाला जास्त महसूल देणारे प्रवर्तकाची निविदा मंजूर केली जाणार आहे.

मनोरंजन उद्यान बांधकाम व चालविण्याचा अनुभव असणाऱ्यांना यात प्राधान्य दिले जाणार आहे. ही जागा फक्त 30 वर्षासाठी बांधा वापरा हस्तांतरण या तत्त्वावर दिली जाणार आहे. या प्रकल्पाची दोन वर्षांत पूर्ण उभारणी करायची आहे. त्यानंतर भाडे सुरू होईल. तीस वर्षानंतर आहे तसाच प्रकल्प महामंडळाला हस्तांतरण करावा लागेल. या प्रकल्पाची निविदा दहा जूनला प्रसिद्ध झाली आहे. 23 जून पर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com