बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात इतर पक्षांची एकी होणार?

Supriya Sule
Supriya Sule

बारामती : लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजू लागले असून आतापासूनच बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्याने त्यांच्याविरोधात उमेदवार देताना इतर पक्षांची एकी होणार का हाच खरा आजचा प्रश्न आहे. 

दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी (ता. 23) बारामती लोकसभा मतदारसंघातील बूथ कमिटी कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधणार आहेत, राज्यात फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाचीच निवड करुन भाजपने योग्य संदेश दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

पंतप्रधानच संवाद साधणार असल्याने साहजिकच भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. दिल्लीस्तरावरुनही आता बारामती लोकसभा मतदारसंघाला वेगळे महत्व दिले जात असल्याची जाणीव या लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या केडरला झाल्याने सगळेच अंग झटकून कामाला लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. 

महादेव जानकरांनी कपबशी या चिन्हावरच बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे दुसरीकडे जाहीर करुन टाकले आहे. त्या मुळे ते कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाहीत, असेच दिसते. भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांनी मात्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे कमळाच्या चिन्हावर लढणाराच उमेदवार द्यावा अशी मागणी केली आहे. महादेव जानकर व कमळाच्या चिन्हावरचा दुसरा उमेदवार असे दोन उमेदवार उभे राहिले तर सुप्रिया सुळे यांचे काम अधिक सोपे होणार यात शंका नाही. 

जानकर मित्रपक्षाचेच असल्याने भाजप त्यांची समजूत काढणार की त्यांनाच ऐनवेळेस पाठिंबा देणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची व्याप्ती विचारात घेता आणि सुप्रिया सुळे यांच्यासारख्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी तितक्याच ताकदीच्या उमेदवाराची गरज भाजपला पडणार आहे. 

भाजपच्या गोटात सुरु असलेल्या चर्चेतून सध्या भीमराव तापकीर, बाळासाहेब गावडे, वासुदेव काळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पक्षश्रेष्ठी कोणत्या नावाला पसंती देतात की ऐनवेळेस नवीनच कोणी उमेदवार देतात या कडे आता सर्वांचेच लक्ष आहे. 

खडतर मेहनत करावी लागणार
सुप्रिया सुळे गेली पाच वर्षे लोकसभा मतदारसंघ विविध कार्यक्रम व उपक्रमांनिमित्त पिंजून काढत आहेत. या मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. लोकसभेतही त्यांनी खासदार म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे, अशा परिस्थितीत त्यांच्या विरोधात तितक्याच ताकदीचा उमेदवार देण्याचे आव्हान भाजपपुढे असेल. 

प्रत्येक मतदारसंघच महत्वाचा
राष्ट्रीय राजकारणात उत्तरप्रदेश खालोखाल महाराष्ट्रात सर्वाधिक जागा असल्याने साहजिकच सर्वच राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जागेवर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रत्येक जागा ही केंद्रात सरकार बनविण्यासाठी महत्वाची ठरणार असल्याने कॉंग्रेस राष्ट्रवादी किंवा भाजप दोन्ही पातळ्यांवर ही निवडणूक व तितक्याच गांभीर्याने घेतली जात आहे. पंतप्रधानांचा बूथ कमिटी कार्यकर्त्यांशी थेट संवाद हे त्याचेच निदर्शक असल्याचे मानले जात आहे. 

पवारांना मतदारसंघात अडकविण्याचीही खेळी...
दर निवडणूकीप्रमाणे यंदाही ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी, राज्यात प्रचारास फार वाव मिळू नये या उद्देशानेही व्यूहरचना करण्याची तयारी सुरु झाली आहे. पवारांचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान व त्यांचा देशातील प्रभाव हे पाहता त्यांना महाराष्ट्राबाहेर पडू न देण्याच्या दृष्टीनेही हालचाली सुरु असल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com