esakal | कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी दिली वातानुकूलित इनोव्हा गाडी

बोलून बातमी शोधा

covid19
कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी दिली इनोव्हा गाडी
sakal_logo
By
रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे . बाधित रुग्णांना उपचारासाठी व संशयित रुग्णांना कोरोना चाचणी करण्यासाठी कोविड उपचार केंद्रात जा ये करण्यासाठी रुग्णवाहिका अथवा खाजगी वाहन वेळेत मिळणे कठीण झाले आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची अडचण विचारात घेऊन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकाध्यक्ष सूरज शहाजी वाजगे या युवकाने स्वतःची वातानुकूलित इनोव्हा गाडी रुग्णसेवेसाठी निशुल्क दिली आहे. या उपक्रमाचे नारायणगाव परिसरातील ग्रामस्थां मधून कौतुक होत आहे.

हेही वाचा: कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करणार; पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय

तालुक्यातील नारायणगाव, वारूळवाडी परिसर कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट झाला आहे. परिसरातील तेरा गावात कोरोनाचे रोज सुमारे पन्नास पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना रुग्णांना उपचारासाठी अथवा संशयित कोरोना रुग्णांना चाचणीसाठी ओझर, लेण्याद्री, शिरोली, नारायणगाव येथील शासकीय कोविड उपचार केंद्रात जा ये करावी लागत आहे. वाढलेल्या रुग्णसंख्ये मुळे शासकीय अथवा खाजगी रुग्णवाहिका मिळणे कठीण झाले आहे. खाजगी रुग्णवाहिका मिळाली तर त्यांच्याकडून सुरू असलेल्या आर्थिक लूटीमुळे सर्वसामान्य रुग्णांना शक्य होत नाही. कोरोनाच्या भीतीमुळे जवळचे लोकही गाडीतून रुग्णालयात नेण्यास नकार देत आहे.या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाजगे यांनी बुधवार( ता.२१) पासून स्वतःची वातानुकूलित इनोव्हा गाडी व चालक निशुल्क रुग्णसेवेत दाखल केली आहे. वाजगे मात्र आता स्वतः दुचाकीचा वापर करत आहे. येथील ग्रामदैवत मुक्ताई मंदिराच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते वातानुकूलित इनोव्हा गाडी रुग्णसेवेत दाखल करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, राजश्री बोरकर, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे, विघ्नहर चे संचालक संतोष खैरे, दिलीप कोल्हे, विलास पाटे, गणेश वाजगे, रोहिदास केदारी, वैजयंती कोऱ्हाळे, भाऊ वारुळे, राजेंद्र कोल्हे, जयेश कोकणे, वरुण भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: नारायणगाव : कोरोनाचे उपचार न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

आमदार बेनके म्हणाले, ''सूरज वाजगे यांनी अनेक अपघातग्रस्त, अत्यवस्थ रुग्ण व गरीब कुटुंबांना अडचणीत मदत केली आहे. कोरोनाचे संकट मोठे आहे. जवळची माणसे आपल्याला सोडून जात आहेत. या संकट काळात शक्य असेल त्यांनी रुग्ण सेवेसाठी मदत करणे आवश्यक आहे.'' वाजगे म्हणाले, ''माझे आई-वडील शिक्षक होते. त्यांच्याकडून मला सामाजिक वसा मिळाला आहे. कोरोनाचे संकट कमी होई पर्यंत माझी गाडी रुग्णांसाठी चोवीस तास आरोग्यसेविका म्हणून काम करेल. गरजूंनी ९८९०४७१७५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.''