
Modi Surname Case: "मोदी हटाओ देश बचाओ" राहुल गांधींच्या शिक्षेचे पडसाद पुण्यात
'चोरों का सरनेम मोदी क्यो होता है…' काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं हे विधान त्यांना भोवलं आहे. या मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयानं राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते. कोर्टानं जामीन दिल्यामुळं राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला आहे. (Surat court convicts Rahul Gandhi in defamation case)
या निकाला नंतर पुण्यात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. मोदी हटाओ देश बचाओ म्हणत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी मोदी सरकारच्या आदेशानुसार सुरत कोर्टाने राहुल गांधींना शिक्षा सुनावली असा काँग्रेसचा आरोप देखील करण्यात आला. पुण्यातील बालगंधर्व चौकात काँग्रेसने हे आंदोलन केलं. आंदोलनात काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी, रमेश बागवे यासह इतर कार्यकर्ते उपस्थितीत होते.
दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील हे प्रकरण आहे. राहुल गांधी यांच्या विधानामुळं संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी (BJP MLA Purnesh Modi) यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली होती.
कोण आहेत पूर्णेश मोदी?
पूर्णेश मोदी हे गुजरात भारतीय जनता पक्षाच्या दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. भूपेंद्र पटेल सरकारच्या कार्यकाळात ते मंत्री राहिले आहेत. लोकांमध्ये त्यांची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते सुरत पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पक्षाच्या कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.