भुशी धरणामध्ये आढळला बुडालेल्या तरुणाचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

लोणावळा - भुशी धरणात बुडालेल्या सुरेंद्र तुकाराम कदम (वय 24, रा. दिवा, जि. ठाणे) याचा मृतदेह चोवीस तासांनंतर सापडला. धरणात बुडून मृत्यू झाल्याची चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे. रविवारी पुण्यातील तिरुपती उल्लेवाड याचा बुडून मृत्यू झाला होता.

सुरेंद्र हा गुरुवारी (ता. 21) पोहताना बुडाला होता. मित्रांनी शोधाशोध केली. स्थानिक जीवरक्षक साहेबराव मराठे, राजू पवार यांच्यासह स्थानिकांनी सुरेंद्रचा पाण्यात शोध घेतला. पोलिसांसह येथील शिवदुर्ग मित्रच्या रेस्क्‍यू टीमच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविली होती. शुक्रवारी (ता. 22) सकाळी पुन्हा कार्यकर्त्यांनी शोधमोहीम सुरू केली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह धरणात आढळून आला.

पोलिस यंत्रणा हतबल
भुशी धरण हे पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. बुडून मृत्यू पावणाऱ्यांची वाढती संख्या पाहता धरणाच्या भिंतीवर काटेरी तारेचे कुंपण घातले आहे. त्यानंतर दोन वर्षांत एकाचाही बुडून मृत्यू झाला नाही. यंदा धरण निम्मेही भरले नसताना आठवड्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. पर्यटकांच्या तुलनेत मनुष्यबळ तोकडे पडत असल्याने पोलिस यंत्रणा हतबल ठरत आहेत. धरणावरील सांडव्यावर बसून वर्षाविहार करणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. पोलिसांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सूचनाफलक लावले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यूस निमंत्रण मिळत आहे.

Web Title: surendra kadam death body receive