'धोनी 2' ची बोलणी चालू केली होती...

Monday, 15 June 2020

सुशांत सिंग राजपूतच्या अकाली जाण्याच्या धक्कयातून सावरणे कठीण जात असताना महेंद्रसिंग धोनीच्या निकटर्तीयांशी बोलणे झाले असता सुशांत सिंग राजपूत बरोबर लॉकडाऊन अगोदर धोनीच्या मॅनेजरची भेट झाली होती आणि धोनी 2 सिनेमाची प्रार्थमिक बोलणी झाली असल्याचे समजले.

पुणे : सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर बॉलिवूड जगताला मोठा हादरा बसला आहे. सिनेजगतातील दिसतात आणि माहीत असल्यापेक्षा जास्त लोक मानसिक आजार, नैराश्याला सामोरे जावे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सुपर हिट सिनेमाच्या यशाच्या पायर्‍या मेहनतीने चढूनही सुशांत सिंग राजपूतला निराशाने का ग्रासले होते याची कारणे शोधली गेली पाहिजेत जेणे करून अशाच समस्येने ग्रासलेल्या लोकांना योग्यवेळी मार्गदर्शनाचा आधार मिळू शकेल.

धोनी फेम सुशांतची अनटोल्ड एक्झिट...

सुशांतचा 'काय पो छे' सिनेमा गाजला तरी त्याला खरे प्रकाशझोताचे वलय महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यावरील सिनेमातील त्याने रंगवलेल्या धोनीच्या भूमिकेने मिळवून दिले. साहजिकच सुशांतने आत्महत्या केल्याचे समजल्यावर धोनीला धक्का बसल्याचे समजले. धोनीने या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्याच्या निकटवर्तीयांनी बोलणे झाले. सुशांत सिंग राजपूतच्या अकाली जाण्याच्या धक्कयातून सावरणे कठीण जात असताना महेंद्रसिंग धोनीच्या निकटर्तीयांशी बोलणे झाले असता सुशांत सिंग राजपूत बरोबर लॉकडाऊन अगोदर धोनीच्या मॅनेजरची भेट झाली होती आणि धोनी 2 सिनेमाची प्रार्थमिक बोलणी झाली असल्याचे समजले.

बेसब्रियां...

धोनीचा मॅनेजर अरुण पांडे यानेच पहिल्या सिनेमाची जुळवाजुळव केली होती. दिग्दर्शक निरज पांडेसोबत अरुणनेच सुशांत सिंग राजपूतला निवडताना बराच विचार केला होता. सिनेमाच्या तयारी दरम्यान सुशांतला धोनीची बसण्या उठण्याची चालण्या फिरण्याची खाण्या पिण्याची आणि बोलण्याची लकब जवळून अभ्यासाला मिळावी म्हणून काही कालावधीकरता तो सतत धोनीसोबत असायचा. सुशांत हसरा, सकारात्मक मेहनती मुलगा होता ज्याची धोनीशी दोस्ती झाली होती. सुशांतने धोनी सारखे शैलीत क्रिकेट खेळता यावे म्हणून माजी खेळाडू किरण मोरेंसोबत 9 महिने क्रिकेटचा सराव केला होता. एकदा मुंबईत बीकेसी सराव सुविधेत सुशांतला फलंदाजी करताना बघून सचिनने किरणला हा कोण नवीन फलंदाज आहे ज्याची शैली धोनीसाखी आहे असा कौतुकाने प्रश्न विचारला होता.  

बॉलिवूडमध्ये जीवघेण्या स्पर्धेत जीव गुदमरतोय!

सिनेमाच्या तयारीकरता सुशांतने धोनीला इतके जवळून अनुभवले होते आणि सिनेमातील पात्र रंगवताना त्याने जीव ओतला असताना त्याने कोणत्या निराशेला लपवत किंवा दडपणाखाली आत्महत्येसारखे एकदम टोकाचे पाऊल उचलले हे धोनी सिनेमा उभा करणार्‍या सगळ्यांना गोंधळवून टाकणारे ठरले आहे. ‘अस्सल’ ची ‘नक्कल’ करताना प्रत्यक्ष धोनीचे विचार अंगी बाणवणे सुशांतला शक्य झाले नाही, या शब्दात धोनीच्या निकटवर्तीयांनी निराशा बोलून दाखवली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Rajput and MS Dhoni biopic sequel News