आरक्षित जागेवर बसणारा कर्मचारी निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

पुणे - पीएमपीच्या बसमध्ये महिलांच्या जागेवर बसणाऱ्या एका कर्मचाऱ्याला प्रशासनाने निलंबित केले; तर प्रवाशांच्या तक्रारीकडे काणाडोळा करणाऱ्या वाहकावरही (कंडक्‍टर) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशाने तक्रार केल्यावर अवघ्या बारा तासांत पीएमपी प्रशासनाने कारवाईची पावले उचलली आहेत.

पुणे - पीएमपीच्या बसमध्ये महिलांच्या जागेवर बसणाऱ्या एका कर्मचाऱ्याला प्रशासनाने निलंबित केले; तर प्रवाशांच्या तक्रारीकडे काणाडोळा करणाऱ्या वाहकावरही (कंडक्‍टर) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशाने तक्रार केल्यावर अवघ्या बारा तासांत पीएमपी प्रशासनाने कारवाईची पावले उचलली आहेत.

मार्ग क्रमांक ३५४ च्या बसमध्ये मार्केट यार्ड बस डेपो ते स्वारगेटदरम्यान रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. मार्केट यार्ड स्थानकावरून पीएमपीचे तीन कर्मचारी बसमध्ये बसले. त्यातील एक कर्मचारी महिलांच्या आरक्षित जागेवर बसला. प्रवासी महिला बसमध्ये आल्यावर अन्य प्रवाशांनी संबंधित कर्मचाऱ्याला महिलांसाठीच्या आरक्षित जागेवरून उठण्याची विनंती केली; परंतु त्याने प्रवाशांना दमबाजी करून शिवीगाळ करण्यास सुरवात केल्याने प्रवाशांनी वाहकाला हस्तक्षेप करण्यास सांगितले; परंतु त्यानेही प्रवाशांच्या तक्रारीकडे काणाडोळा करीत, महिलांसाठीच्या आरक्षित जागेवर बसणाऱ्या कर्मचाऱ्याची पाठराखण केली. त्या वेळी बसमधील बहुतेक प्रवाशांनी या घटनेत हस्तक्षेप केला; परंतु संबंधित कर्मचारी स्वारगेटपर्यंत आरक्षित जागेवरून उठला नाही. स्वारगेटला बसमधून उतरून तो निघून गेला. 

बसमधील एका प्रवाशाने तिकिटावर असलेल्या पीएमपीच्या तक्रारनिवारण कक्षात दूरध्वनीवर (क्र. ०२०-२४५०३३५५) संपर्क साधून ही माहिती दिली; तसेच पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना व्हॉट्‌सॲपवर तक्रार पाठविली. प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित बस आणि वाहकाचा शोध घेतला. प्राथमिक चौकशी करून सोमवारी सायंकाळी संबंधित कर्मचारी आणि वाहकाला निलंबित केले. संबंधित वाहक पिंपरी डेपोचा आहे. आता या दोघांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित प्रवाशालाही प्रशासनाने या कारवाईची माहिती ई-मेल, व्हॉट्‌सॲप आणि दूरध्वनीवरून संपर्क साधून दिली. पीएमपीमध्ये संगणकीय तक्रारनिवारण कक्ष दोन महिन्यांपासून सुरू झाला असून, त्या माध्यमातून प्रवाशांच्या तक्रारींचा निपटारा वेगाने होण्याचे प्रमाण वाढले आहे. 

पोलिसांमार्फत कारवाई होणार 
पीएमपी बसमध्ये महिलांसाठी डाव्या बाजूची रांग राखीव आहे. त्या जागांवर महिलांनीच बसून प्रवास करायचा आहे. त्या जागांवर पुरुष प्रवासी बसल्यास त्यांना उठविण्याच्या सूचना वाहकांना देण्यात आल्या आहेत. विनंती करूनही पुरुष प्रवासी आरक्षित जागेवरून न उठल्यास त्यांच्यावर पोलिसांमार्फत कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश पीएमपी प्रशासनाने सर्व आगारांतील वाहक आणि चालकांना दिला आहे; तसेच अंध, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित जागांवरही अन्य प्रवाशांना बसू देऊ नये, असा आदेश दिला आहे. 

Web Title: Suspended worker in reserved space