#MeToo सिंबायोसिस संस्थेतील दोन प्राध्यापकांचे निलंबन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पुणे - सिंबायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधील (एससीएमसी) आजी-माजी विद्यार्थ्यांनी ‘MeToo’चळवळीअंतर्गत काही प्राध्यापकांवर आरोप केले होते. याबाबत चौकशी होईपर्यंत या प्रकरणाशी संबंधित दोन प्राध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे, तर एका संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे, अशी माहिती सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी दिली.

लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठविणाऱ्या ‘MeToo’ चळवळीने सोशल मीडियावर जोर धरला आहे. या चळवळीअंतर्गत विमाननगर येथील सिंबायोसिस संस्थेत अत्याचार झाल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाद्वारे केली होती. यानंतर संस्थेने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली.  विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार तीन प्राध्यापक, दोन शिक्षकेतर कर्मचारी, तीन विद्यार्थी आणि एक तज्ज्ञ यांचा समितीत समावेश आहे. या समितीमार्फत प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीदरम्यान काही माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात येत आहे. काही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष येऊन माहिती सांगण्याची तयारी दाखविली आहे. चौकशीदरम्यान संस्थेतील कामकाज सुरळीत चालावे म्हणून सेंटरने संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे, तर दोन प्राध्यापकांना निलंबित केले आहे. समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलंबन असल्याचे डॉ. येरवडेकर यांनी नमूद केले.

या महाविद्यालयातील जवळपास १०० पेक्षा अधिक विद्यार्थिंनींनी विशेषत: माजी विद्यार्थिंनींनी ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर लैंगिक शोषणाच्या प्रकारांविषयी व्यक्त होण्यास सुरवात केली. त्यात विद्यार्थिंनींनी काही विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या नावांचाही उल्लेख केला आहे. त्यावरून त्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून चौकशी करण्यात येत आहे.

सिंबायोसिस संस्थेकडे कोणत्याही विद्यार्थिंनीची लेखी तक्रार अद्याप आलेली नाही. मात्र, ‘मी टू’ चळवळीअंतर्गत सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या आधारे संबंधितांची चौकशी करण्यात येत आहे. त्यात काही माजी विद्यार्थी असल्याने त्यांच्याशी संपर्क साधून चौकशी करण्यास वेळ लागणार आहे.
- डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका, सिंबायोसिस शिक्षण संस्था

Web Title: Suspension of two professors of Symbiosis Institute