सुतार दवाखान्याला अतिक्रमणाचा वेढा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

कोथरूड परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यदूत असलेला सुतार दवाखाना अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. हतबल प्रशासन आणि मुजोर पथारीवाले यामुळे सुतार दवाखाना परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

रुग्णवाहिकेसाठी अपुरा पडतो रस्ता
पौड रस्ता - कोथरूड परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यदूत असलेला सुतार दवाखाना अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. हतबल प्रशासन आणि मुजोर पथारीवाले यामुळे सुतार दवाखाना परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

जयबाई सुतार दवाखाना परिसरात रस्त्यावर भाजी मंडई भरते. आझादनगरचा विवेकानंद चौक ते रानवडे वाचनालयापर्यंतच्या परिसरात भाजी, फळे व विविध वस्तूंची रस्त्यावर विक्री केली जाते. संगम चौक ते भेलकेनगर हा रस्ता अरुंद आहे. त्यातच रस्त्यावर भरणाऱ्या मंडईमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. गुजरात कॉलनीतून येणाऱ्या बस संगमचौकाकडे वळताना तिन्ही रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. तसेच येथील सुमनताई माथवड मंडईच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने गाळेधारकांना पदपथावर गाळे थाटून व्यवसाय करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. योग्य नियोजन नसल्याने सुतारदवाखाना परिसरात रोजच कोंडी व गोंधळाची स्थिती असते. त्याचा फटका येथील आरोग्यसेवेला होत असतो. 

रुग्णवाहिका दवाखान्यात आणणे व बाहेर काढणे हे दिव्यच असते. काही पथारीव्यावसायिकांनी तर रुग्णालयाच्या जागेतील पार्किंगमध्ये आपली वाहने लावली आहेत. पथारीवाल्यांच्या या मुजोरीला शिस्तीचा बडगा लावण्यात अतिक्रमण विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे.

कर्मचारी कमी असले तरी आठवड्यातून दोनदा आम्ही कारवाई करतो. या परिसरात संध्याकाळी पथारीवाल्यांचे अतिक्रमण वाढते. त्या वेळी कर्मचारी उपलब्ध नसल्याने कारवाईवर मर्यादा येतात. तरीसुद्धा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी कारवाई करण्यात येते.
- संजय कुंभार, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक

Web Title: Sutar Hospital Encroachment Traffic