...तर स्वाभिमानी पक्ष महाआघाडीत सहभागी होईल - राजू शेट्टी
पुणे - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतमालाला दीडपट हमीभाव या मुद्यांना किमान समान कार्यक्रमात स्थान द्यावे. तसेच, याबाबत लोकसभेत मांडलेल्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यास पाठिंबा दिल्यास स्वाभिमानी पक्ष महाआघाडीत सहभागी होईल, अशी घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात केली.

शेट्टी म्हणाले, सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडून किळसवाणे राजकारण सुरू आहे. जाती-जातीमध्ये द्वेष निर्माण करून डोकी फोडायची आणि रक्ताचा गुलाल उधळून राजकारण करायचे, हे महाराष्ट्रासाठी नवे आहे. मूलतत्त्ववादी विचारांच्या विरोधात व्यापक महाआघाडी व्हावी, अशी जनतेची धारणा आहे. भारतीय जनता पक्ष वगळता आठ-दहा राजकीय पक्षांनी एकत्रित यावे, याबाबत चर्चा सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून प्रकाश आंबेडकर यांची नुकतीच भेट घेतली होती. जनतेच्या महाआघाडी होण्याच्या इच्छेला डावलून जाता येणार नाही; परंतु ती किमान समान कार्यक्रमांवर आधारित असावी, अशी स्वाभिमानी पक्षाची इच्छा आहे. भाजपच्या जातीयवादी धोरणाप्रमाणेच एमआयएमच्या धोरणालाही आमचा विरोध आहे. जाती-धर्मात तेढ निर्माण करणारा विचार स्वाभिमानीला मान्य नाही. तरीही किमान समान कार्यक्रमावर आधारित वादग्रस्त मुद्दे बाजूला दूर ठेवून सरकारच्या विरोधात एकत्रित येण्याची तयारी असल्यास आम्ही त्यात सहभागी होऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.