अखेर ठरलं, अशीच धावणार कात्रज-स्वारगेट मेट्रो!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

पुणे - स्वारगेट-कात्रज यादरम्यानची मेट्रो भुयारी होणार का एलिव्हेटेड, याबाबतची उत्सुकता आता संपली आहे. ही मेट्रो भुयारीच होणार असून, त्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. राज्य सरकार आणि महापालिका यांनी खर्चाचा तिढा सोडविल्यावर मेट्रोच्या कामाला सुरवात होऊ शकते.

पुणे - स्वारगेट-कात्रज यादरम्यानची मेट्रो भुयारी होणार का एलिव्हेटेड, याबाबतची उत्सुकता आता संपली आहे. ही मेट्रो भुयारीच होणार असून, त्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. राज्य सरकार आणि महापालिका यांनी खर्चाचा तिढा सोडविल्यावर मेट्रोच्या कामाला सुरवात होऊ शकते.

स्वारगेट-कात्रज मेट्रो सुमारे ६ किलोमीटर असेल. याबाबतचा प्रकल्प अहवाल तयार असून, लोकप्रतिनिधींची बैठक झाल्यावर महापालिकेमार्फत तो राज्य सरकारकडे सादर होईल. सर्व शक्‍यतांचा अभ्यास करून हा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. एलिव्हेटेड मेट्रो केली असती, तर अंतर सुमारे १२ ते १५ किलोमीटर झाले असते आणि खर्चही वाढला असता. त्यामुळे भुयारी मेट्रोचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एचसीएमटीआर’च्या मार्गावर एलिव्हेटेड पद्धतीने मेट्रो न्यू धावणार आहे. त्याचा आराखडा येत्या सहा महिन्यांत महामेट्रो तयार करणार आहे.  त्यानुसार नेहमीच्या मेट्रोपेक्षा या मेट्रोच्या डब्याचा आकार लहान असेल. तसेच, मेट्रो न्यूसाठी टायर असतील. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारची मेट्रो असेल. त्यामुळे या मेट्रोला लोहमार्ग नसेल. पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे ५०, तर नाशिकमध्ये सुमारे ३२ किलोमीटर मेट्रो न्यू असेल. नाशिकसाठीचा आराखडा राज्य सरकारला सादर झाला आहे. भविष्यात प्रवासी वाढले, तर लोहमार्ग टाकून मेट्रो अपग्रेड होऊ शकेल, अशी माहिती मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

मेट्रोचे डबे ॲल्युमिनियमचे!
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रोचे १०२ डबे ॲल्युमिनियमचे असतील. त्याचे उत्पादन २५ टक्के इटलीमध्ये होईल, तर जोडणीचे काम ७५ टक्के नागपूरमध्ये महामेट्रोच्या जागेत होणार आहे. मेक इन इंडियाअंतर्गत त्यात महामेट्रोला उत्पादक कंपनीकडून किमान १० टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे महामेट्रोला दरवर्षी सुमारे ७०-८० कोटी रुपये मिळतील. पुण्यातील मेट्रोचे डबे ॲल्युमिनियमचे आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-स्वारगेट  ‘पर्पल मेट्रो’?
जगभरातील आणि विविध शहरांतील मेट्रो प्रकल्पांचे नाव रंगसंगतीच्या माध्यमातून दिले जाते. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड-स्वारगेटसाठी ‘पर्पल मेट्रो’, तर वनाज-रामवाडी मार्ग नदीपात्रातून जाणार असल्यामुळे ‘ॲक्वा मेट्रो’ असे नाव देण्याचा मानस दीक्षित यांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swargate-Katraj metro subway