Swargate to Hadapsar BRT Line
Swargate to Hadapsar BRT LineSakal

BRT Journey : बीआरटीचा प्रवास खडतर; बसथांबे हटविले, राडारोडा जागेवरच

स्वारगेट ते हडपसर दरम्यानच्या बीआरटी मार्गावरील सर्व बसथांबे काढून टाकण्यात आले आहेत. त्यामध्ये प्लॅटफॉर्मची मोठ्याप्रमाणात फूटतूट झाली आहे.
Summary

स्वारगेट ते हडपसर दरम्यानच्या बीआरटी मार्गावरील सर्व बसथांबे काढून टाकण्यात आले आहेत. त्यामध्ये प्लॅटफॉर्मची मोठ्याप्रमाणात फूटतूट झाली आहे.

हडपसर - स्वारगेट ते हडपसर दरम्यानच्या बीआरटी मार्गावरील सर्व बसथांबे काढून टाकण्यात आले आहेत. त्यामध्ये प्लॅटफॉर्मची मोठ्याप्रमाणात फूटतूट झाली आहे. आठ -दहा दिवस होऊनही त्याचा राडारोडा जागेवरच असल्याने प्रवाशांना त्यातून कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

स्वारगेट ते हडपसर या साडेनऊ किलोमीटरच्या अपूर्ण बिआरटी मार्गावर केवळ घोरपडी रस्ता चौक ते मगरपट्टा बीआरटी मार्ग असल्याचे दिसून येते. या बीआरटी मार्गात घोरपडी रस्ता चौक, रामटेकडी, किर्लोस्कर रेल्वेपूल, वैदूवाडी, मगरपट्टा आदी ठिकाणी सोळा बीआरटी बसथांबे आहेत. या बसथांब्यांची शेड नादुरुस्त झाल्याचे कारण देत हे सर्व बसथांबे बीआरटी प्रशासनाकडून आठ दिवसांपूर्वी हटविण्यात आले आहेत. ते काढताना या सर्व ठिकाणचे प्लॅटफॉर्म उखडले आहेत. त्यातून निघालेला राडारोडा अद्यापही जागेवरच पडून आहे.

बीआरटीमध्ये चढ उतर करताना प्रवाशांना याच प्लॅटफॉर्मच्या राड्यारोड्यात धोकादायकपणे वावरावे लागत आहे. बसमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशांना याठिकाणी पडलेल्या राडारोड्यात अडखळावे लागत असून त्यातून छोटेमोठे अपघात होत आहेत. काही प्रवासी यामध्ये ठेचकळून जखमी झाले आहेत. त्यासाठी बीआरटी प्रशासनाने या प्लॅटफॉर्मची तातडीने दुरुस्ती करून शेडची उभारणी तसेच आवश्यक सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवासी सुधीर मेथेकर, सुहास मचाले, ऋतुजा हजारे, गौतमी शर्मा, तुकाराम शिरवणे आदी प्रवाशांनी केली आहे.

"पुरेशा रूंदीचा रस्ता नसतानाही बीआरटी सुरू केली हेच चुकीचे होते. प्रशासनाकडून सर्वच नियमांची पायमल्ली होत आहे. या मार्गामुळे अपघात वाढले, इतर वाहनांची कोंडी झाली. प्रवाशांना पुरेशा सुविधा नाहीत. धोकादायकपणे प्रवास करावा लागत आहे. केवळ दोन अडीच किलोमीटरवर सध्या बीआरटी दिसते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन बीआरटीचे सर्व बसथांबे रस्त्याच्या कडेला आणावेत. अन्यथा, सध्याच्या बसथांब्यावर नव्याने बांधले जाणारे बसथांबे होऊ देणार नाही.'

- योगेश ससाणे, माजी नगरसेवक

'बीआरटी प्रकल्प चांगला आहे. मात्र, त्यामध्ये मोठ्याप्रमाणात त्रुटी आहेत. प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. सध्या बसथांबे खोदून काढले आहेत. आम्हा प्रवाशांना उभे राहायला जागा नाही. आता कधी काम होईल, सांगता येत नाही. तोपर्यंत जीव धोक्यात घालून प्रवास करायचा.'

- गंगाधर यादव, प्रवासी

'बसथांबे मोडकळीस आले होते, त्यामुळे त्यावरील शेड काढण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्मची दुरूस्ती करून नवीन शेड टाकण्यात येणार आहे. बीआरटी सेवा सुरू ठेवावी, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.'

- अनंत वाघमारे, बीआरटी प्रमुख

'बीआरटी सेवा कायम ठेवायची मागणी पीएमपीएलकडून होत आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील.'

- व्ही. जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता, पथ विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com