राज्यात स्वाइन फ्लूचे मृत्यू वाढले

राज्यात स्वाइन फ्लूचे मृत्यू वाढले

पुणे : राज्यात गेल्या तीन वर्षांतील जानेवारी महिन्यात स्वाइन फ्लूने एकूण दहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. यंदा मात्र, रेंगाळलेली थंडी आणि थंडीच्या वाढलेल्या तीव्रतेमुळे यंदाच्या जानेवारी महिन्यातच स्वाइन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 12 झाली आहे. 

देशात यंदा थंडीची तीव्रता जास्त होती. उत्तर भारतात अद्यापही थंडी आहे. तेथून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात यंदा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत थंडी रेंगाळली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी किमान तापमान अद्यापही 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदविला जात आहे. असे थंड वातावरण स्वाइन फ्लूच्या "एच1एन1' विषाणूंच्या उद्रेकासाठी पोषक ठरते. त्यामुळे यंदा राजस्थान, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याची माहिती पुढे आली आहे. 

राज्यात गेल्या तीन वर्षांमध्ये स्वाइन फ्लूमुळे एक हजार 266 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी जानेवारी महिन्यात दहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य खात्यात झाली. यंदा मात्र, गेल्या तीन वर्षांपेक्षा जास्त मृत्यूची नोंद एकट्या जानेवारीमध्ये झाली आहे. त्यामुळे यंदा स्वाइन फ्लू नियंत्रणाची यंत्रणा पुन्हा सक्रिय करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. 
याबाबत राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, ""उत्तर भारतातील कडाक्‍याच्या थंडीचा थेट परिणाम यंदा स्वाइन फ्लूच्या संसर्गवाढीवर झालेला दिसतो. थंड वातावरणामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा संसर्ग वाढल्याचे दिसते. तसेच, किमान आणि कमाल तापमानातील वाढलेली तफावत हे देखील त्यामागचे कारण आहे.'' 

राज्यात गेल्या वर्षी जानेवारीमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. यंदा आतापर्यंत 17 रुग्ण स्वाइन फ्लूच्या संसर्गाने मृत्युमुखी पडले असून, त्यापैकी 12 मृत्यू हे जानेवारी महिन्यातील आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्यात गेल्या वर्षी स्वाइन फ्लूच्या विषाणूंना प्रतिबंध करणाऱ्या एक लाख 28 हजार लस मोफत देण्यात आल्या होत्या. तसेच, स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्यांना प्रभावी उपचाराची पद्धत स्वीकारण्यात आली आहे. त्यातून राज्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूवर नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा रुग्णांनी स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच तातडीने उपचार घेणे आवश्‍यक आहे. 
डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग, महाराष्ट्र 


वर्ष ......... स्वाइन फ्लूचे वर्षभरातील मृत्यू 
2016 ...... 26 
2017 ....... 778 
2018 ........ 462

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com