अभ्यासक्रम प्राधान्याने बदलणार - प्रकाश जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

पुणे - अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांनो, तुमच्यावरील ताण कमी करण्यासाठी अभ्यासक्रम प्राधान्याने बदलण्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी केली. तुम्हाला मोकळा श्‍वास घेता येईल, छंद जोपासला येईल, व्यायामाला पुरेसा वेळ मिळेल, अशी व्यवस्था नव्याने विकसित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात असेल.

पुणे - अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांनो, तुमच्यावरील ताण कमी करण्यासाठी अभ्यासक्रम प्राधान्याने बदलण्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी केली. तुम्हाला मोकळा श्‍वास घेता येईल, छंद जोपासला येईल, व्यायामाला पुरेसा वेळ मिळेल, अशी व्यवस्था नव्याने विकसित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात असेल.

"लॅप्रो ओबेसो सेंटर'तर्फे (एलओसी) देशातील पहिल्या "बॅरियाट्रिक एन्डोस्कोपी सर्जरी ट्रेंड्‌स' (बेस्ट) या आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे उद्‌घाटन जावडेकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी ही घोषणा केली. या निमित्ताने "ओबेसिटी प्रिव्हेन्शन ऍण्ड कंट्रोल टास्क फोर्स'ची स्थापनाही करण्यात आली. परिषदेचे संयोजक डॉ. शशांक शहा, इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, डॉ. सुभाष खन्ना, डॉ. महेश ठोंबरे आणि डॉ. पूनम शहा व्यासपीठावर उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले, 'फिट इंडिया' हा आता अभ्यासक्रमाचा भाग असेल. त्यासाठी अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात येतील. त्या माध्यमातून मुलांवर आरोग्याचे चांगले संस्कार होतील. आरोग्य पूर्ण जगण्यासाठी काय करणे आवश्‍यक आहे, हे या अभ्यासक्रमातून मुलांना शिकविण्यात येईल.''

आजच्या अभ्यासक्रमात विद्यार्थी स्वतःला हरवत आहे. शारीरिक शिक्षण, कौशल्यावर आधारित शिक्षण, मूल्यशिक्षण यासाठी त्याला वेळ मिळेल, असा अभ्यासक्रम विकसित करण्यात येणार असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले.

संगणक, टीव्ही आणि मोबाईल या चौकटीत मुले तासन्‌तास बसतात. मैदानी खेळ आता कमी झाले आहेत. त्यामुळे मुले आणि त्यांच्या पालकांमध्ये लठ्ठपणाबद्दल जनजागृती करणे हे "टास्क फोर्स'चे काम असेल. टास्क फोर्सच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण कल्पना पुढे येतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. शहा म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या "फिट इंडिया'ला प्रतिसाद म्हणून टास्क फोर्सचा उपक्रम हाती घेतला आहे. यातून स्थूलता प्रतिबंधित करता येईल. तसेच, त्याबाबत जनजागृती केली जाईल.''

"फिट इंडिया'चा हाच मंत्र
संसदीय निधीतून पुण्यासह विविध शहरांमध्ये "ओपन जिम' विकसित करण्याचा निश्‍चय केला आहे. त्यातून स्नायूंना इजा न होता आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. "फिट इंडिया'चा हाच मंत्र आहे, असेही केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: syllabus changes prakash javadekar