अॅडमिशन घ्यायचंय पण कागदपत्रे नाहीत? विद्यार्थ्यांनो, टेन्शन घेऊ नका, ही बातमी वाचा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

अधिवास, जात, नॉन क्रिमीलेयर आदी प्रमाणपत्रे प्रवेशासाठी आवश्यक असतात. परंतु लॉकडाऊनमुळे ही प्रमाणपत्रे मिळणार कशी, असा विचार विद्यार्थी करू लागले आहेत. पण जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांची चिंता दूर केली आहे.

पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचाय? त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे लॉकडाऊनमुळे कशी मिळणार, हा विचार करीत असाल, तर काळजी करू नका. लॉकडाऊन सुरू असला, तरी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अगदी घरी बसूनही प्रमाणपत्रांसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

अधिवास, जात, नॉन क्रिमीलेयर आदी प्रमाणपत्रे प्रवेशासाठी आवश्यक असतात. परंतु लॉकडाऊनमुळे ही प्रमाणपत्रे मिळणार कशी, असा विचार विद्यार्थी करू लागले आहेत. पण जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांची चिंता दूर केली आहे. पुुण्यात कोरोना बाधिक क्षेत्रे वगळता अन्य ठिकाणी महा ई-सेवा केंद्रे, नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. पुणे शहर आणि हवेलीमध्ये विविध ठिकाणी महा ई-सेवा केंद्रे सुरू झाली आहे. त्यासाठी जाऊन विद्यार्थी अर्ज करू शकतात. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ सरकारी नागरी सुविधा केेंद्रातमध्ये जाऊन प्रमाणपत्रांसाठी अर्ज करता येतील.

खेकडे, मासे पकडणाऱ्यांच्या हाती आले टॅब

राज्य सरकारच्या आपले सरकार महाऑनलाइन या संकेतस्थळवर विद्यार्थी स्वत: ऑनलाइन अर्ज भरू शकतो. प्रमाणपत्र मिळण्यासाठी गरजेची असलेली छायाचित्रासह सर्व कागदपत्रे अपलोड करू शकतो. ही कागदपत्रे पुण्यातील महसूल यंत्रणेकडे जातात, त्याची पडताळणी केल्यानंतर परिपूर्ण अर्जाला प्रमाणपत्र दिले जाते. अर्जात त्रुटी वा कागदपत्रे अपूर्ण असतील, तर त्याची माहिती अर्जदाराला दिली जाते. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना घराबाहेर पडण्याची गरज नाही.

पुणे शहरात सुमारे 68 आणि हवेली तालुक्यात 69 महा ई-सेवा केंद्र आहेत. हवेलीतील बहुतांश केंद्र सुरू आहेत. मात्र, पुणे शहराचा बराचसा भाग बाधित क्षेत्र असल्याने तेथील केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. या भागात राहणार्‍या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळावायची असल्यास त्यांना आपे सरकार महाऑनलाइन संकेतस्थळाचा पर्याय आहे. 

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी म्हणाले, लॉकडाऊन काळात गेली दोन महिने बंद असलेली ही केंद्रे आता सुरू झाली आहेत. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज आमच्याकडे आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे लवकर मिळावीत यासाठी महसूल यंत्रणा प्रयत्नशील आहे. अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमुळे नाकारले जातात. असे विद्यार्थी एंजट किंवा सरकारी यंत्रणेशी संबंध नसलेल्या व्यक्तींकडून प्रमाणपत्रे मिळवायचा प्रयत्न करतात. यात त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नायब तहसीलदार संजय भोसले यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना अर्ज एखाद्या कारणासाठी नाकारला गेला असेल, तर अन्य कोणत्याही माध्यमातून अवैध मार्गाने प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न करू नका. त्रुटीबाबत काही शंका असतील वा विचारणा करायची असेल, तर तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा. यातून विद्यार्थ्यांचा प्रश्‍न सुटू शकेल आणि कुणाकडूनही फसवणूक होणार नाही, असे भोसले यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा प्रशासनाने प्रमाणपत्रांसाठी शुल्क निश्‍चित केलेले आहे. सर्व महा ई सेवा केंद्रांमध्ये हे दरपत्रक लावलेले आहे. त्यापेक्षा अधिक रक्कम कुणीही देऊ नये. लॉकडाऊनचा काळात कुणी अधिक पैशांची मागणी करीत असेल, तर तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.
- संजय भोसले (नायब तहसिलदार, हवेली)

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: system for issuing certificates to students has been started in lockdown situation