टागोर शाळा भरणार आता सुसज्ज इमारतीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे - पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाची इंग्रजी माध्यमाची रवींद्रनाथ टागोर शाळा आता एक किलोमीटर अंतराने शहराजवळ आणि सुसज्ज अशा इमारतीमध्ये भरणार आहे. याबरोबर नोकरी करणाऱ्या महिलांसाठी बोर्ड चार मजली वसतिगृह उभारत आहे.

पुणे - पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाची इंग्रजी माध्यमाची रवींद्रनाथ टागोर शाळा आता एक किलोमीटर अंतराने शहराजवळ आणि सुसज्ज अशा इमारतीमध्ये भरणार आहे. याबरोबर नोकरी करणाऱ्या महिलांसाठी बोर्ड चार मजली वसतिगृह उभारत आहे.

कॅंटोन्मेंट भागातील बूटी स्ट्रीट परिसरात गेल्या चौदा वर्षांपासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळा भरत होती; परंतु या परिसरात मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आल्याने शाळा हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी बाबाजान दर्गा परिसरात बोर्डाच्या अग्निशामक दलाजवळ शाळेची इमारत उभारण्यात आली. अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्या पाल्यांसाठी ही शाळा चालविली जाते. येत्या सहा तारखेला या इमारतीचे उद्‌घाटन केले जाणार आहे.

सरकारी वा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळावी, म्हणून बोर्ड चार मजली इमारत बांधत आहे. यात ९६ महिला आणि २५ मुलांसाठी पाळणाघर असेल. ज्या महिलांचे दरमहा उत्पन्न २५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळेल. या प्रक्रियेसाठी निवड समिती असेल. प्रत्येक मजल्यावर १६ खोल्या असतील. तळमजल्यावर मेसही सुरू केली जाणार आहे.

महिला आणि बालकल्याण खात्याच्या योजनेअंतर्गत महिलांना राहण्यासाठी सुरक्षित वसतिगृह बांधले आहे. देशातील ६२ कॅंटोन्मेंट बोर्डांमध्ये पुण्यात होणारा हा पहिला प्रकल्प आहे. त्याचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे.
- सुखदेव पाटील, कार्यकारी अभियंता, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड

अल्प उत्पन्न गटातील मुलांनादेखील त्यांच्या जीवनात यशस्वी होता म्हणून बोर्डाने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली होती. ती नव्या वास्तूत भरेल. मुलांना खेळासाठी मोठे मैदानही उपलब्ध होईल.
- डॉ. डी. एन. यादव,  मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड

नव्या शाळेची वैशिष्ट्ये
तीन मजली इमारत, ४० वर्गखोल्या
संगणक आणि विज्ञान प्रयोगशाळा
विद्यार्थी, विद्यार्थिनींना स्वतंत्र स्वच्छतागृह
खेळासाठी विद्यार्थ्यांना मैदान 
प्रवेशक्षमता सुमारे दीड हजार

Web Title: Tagore School now filled in a well-built building