पर्यटकांनो, मुळशीत येऊ नका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

- मुळशी धरण परिसरात पावसामुळे अतिवृष्‍टी सदृष्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. - माले (ता.मुळशी) येथे पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्‍त्‍यावर दीड फुट पाणी साचल्‍याने सुरक्षिततेसाठी रस्‍ता छोटया वाहनांसाठी बंद करण्‍यात आला आहे.
- मुळशीतून पौड येथे वाहने बंद करण्‍यात आली, तर कोकणातून माणगाव बाजुनेही बंद करण्‍याच्‍या सुचना देण्‍यात आल्‍या आहेत.
- अतिवृष्‍टी सदृष्‍य परिस्थिती असल्‍याने पर्यटकांनी मुळशीत येणे टाळावे' असे आवाहन मुळशीचे तहसीलदार अभय चव्‍हाण यांनी केले.

माले : मुळशी धरण परिसरात पावसामुळे अतिवृष्‍टी सदृष्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. माले (ता.मुळशी) येथे पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्‍त्‍यावर दीड फुट पाणी साचल्‍याने सुरक्षिततेसाठी रस्‍ता छोटया वाहनांसाठी बंद करण्‍यात आला आहे. मुळशीतून पौड येथे वाहने बंद करण्‍यात आली, तर कोकणातून माणगाव बाजुनेही बंद करण्‍याच्‍या सुचना 
देण्‍यात आल्‍या आहेत. 'अतिवृष्‍टी सदृष्‍य परिस्थिती असल्‍याने पर्यटकांनी मुळशीत येणे टाळावे' असे आवाहन मुळशीचे तहसीलदार अभय चव्‍हाण यांनी केले.

मुळशी धरण भागात अतिवृष्टी चालू असून गेल्या ४८ तासात ९०० मीमी पावसाची नोंद झालेली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ताम्हिणी येथे  ४१५ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. जोराच्‍या पावसामुळे मुळशी धरण ९९ टक्‍के भरले असुन १८.३१ टीएमसी पाणी साठा झाला आहे. धरणभागात आवक ५०००० ते ५५००० क्युसेक्स ने होत आहे. सरासरी ताशी पर्ज्यन्यमान २०-२५ मीमी होत आहे. अन्‍य परिसरातही जोरदार पर्जन्‍यवृष्‍टी होत आहे. सकाळी धरणातील विसर्ग २८००० क्‍युसेक्‍सवरुन ३२००० करण्‍यात आला. विसर्गामुळे नदीकाठच्‍या शेत, घरांमध्‍ये पाणी शिरले. 

मुळशी धरणाच्‍या वळणे बाजुस मुळा नदीच्‍या पलिकडील गावांना जोडणाऱ्या संभवे पुलाला पाण्‍याची पातळी चिकटली असल्‍याने संभवे पुल शनिवारी (ता.३) रात्रीपासून वाहतूकीसाठी बंद करण्‍यात आला आहे. त्‍यामुळे संभवे, वळणे, नानिवली, चांदिवली, शिरगाव, कुंभरी, पोमगाव, देवघर, विसाघर आदी गावांतील लोकांना रावडे-भादस मार्गे प्रवास करावा लागत आहे. 

पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्‍त्‍यावरील शेडाणी फाटा चौकात धरणाच्‍या विसर्गाचे दीड फुट पाणी साठल्‍याने छोटया वाहनांची वाहतूक थांबवण्‍यात आली. मुळशी धरण परिसरात वर्षाविहारासाठी जाणाऱ्या पर्यटकांना तसेच छोटया वाहनांना पौड (ता.मुळशी) येथूनच परत पाठवण्‍यात येत आहे. माले येथे मुळा नदीकाठच्‍या एका हॉटेलमध्‍ये अडकलेल्‍या दोन पर्यटकांना मुळशी आपत्‍ती व्‍यवस्‍थापन टीमने पुराच्‍या पाण्‍यातून बाहेर काढले.

'मुळशी धरण परिसरात मोठी पर्जन्‍यवृष्‍टी सुरुच आहे. पुणे-ताम्हिणी-कोलाड महामार्गावर माले येथे रस्‍त्‍यावर दीड फुट पाणी साचल्‍याने सुरक्षिततेसाठी छोटी वाहने, पर्यटकांना पौड येथून परत पाठवण्‍याच्‍या सुचना पोलिस, प्रशासनास दिल्‍या आहेत. तसेच ताम्हिणी बाजुने येणारी वाहने बंद करण्‍यासाठी माणगाव तहसिलदार, माणगाव पोलिस स्‍टेशन यांना कळविले आहे. पावसाचा जोर पाहुन यात बदल करण्‍यात येतील. पर्यटन स्‍थळांच्‍या परिसरातील पाऊस पाहता सद्यस्थितीत पर्यटकांनी मुळशीत येऊ नये.' असे आवाहन मुळशीचे तहसीलदार अभय चव्‍हाण यांनी केले. 

धरणात मुळशी धरण परिसरात गेल्‍या चोवीस तासांत नोंदण्‍यात आलेला पाऊस 
(मिलीमीटरमध्‍ये कंसात एकुण पाऊस) 
 मुळशी कॅम्‍प - १९० (२५१४)
 दावडी - ३९७ (४८७२)
ताम्हिणी - ४१५(५४१४)
शिरगाव- ३९०(५२९९)
आंबवणे- ३२८ (४७७९).

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tahsildar Appeal to tourists not to visit Mulshi