थंडावा देणारा आहार घ्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला; तापमान चाळीस अंशांवर
पुणे - शहरातील कमाल तापमान सलग पाच दिवस 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्याने हा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी शरीराला थंडावा देईल, असा आहार घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला; तापमान चाळीस अंशांवर
पुणे - शहरातील कमाल तापमान सलग पाच दिवस 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्याने हा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी शरीराला थंडावा देईल, असा आहार घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

पुण्यासह राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका वाढला आहे. याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. निसर्गातील या बदलांशी जुळवून घेण्यासाठी आहारातील बदल महत्त्वाचा असतो. उन्हात फिरणे, जास्त प्रमाणात शारीरिक श्रम करणे, तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ आहारात घेणे किंवा अतिव्यायाम यातून उन्हाळ्यात त्रास होण्याचा धोका असतो. त्यासाठी या काळात योग्य आहार घेतला पाहिजे. त्यातून उन्हाळ्याचा त्रास कमी होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले म्हणाले, 'उन्हाळ्यात जेवण फारसे जात नाही. त्यामुळे पोळी, भाकरी अशा प्रकारच्या घन आहाराऐवजी सरबत, ताक, शहाळे, सूप असा द्रव आहार घ्यावा. त्यात शीतपेयांचा समावेश करू नये. कारण त्यातून उष्णता वाढते. असा द्रव आहार दिवसातून वेळोवेळी घ्यायला हवा. कारण घन आहारातून शरीराला मिळणाऱ्या ऊर्जेच्या तुलनेत द्रव पदार्थातील ऊर्जा कमी टिकते. त्यामुळे या आहारात वारंवारिता ठेवली पाहिजे.

लहान मुलांना भर उन्हात जेवण देऊ नये. त्या ऐवजी सकाळी लवकर आणि रात्री उशिरा जेवण द्यावे आणि या दरम्यान उन्हाळ्यातील फळे द्यावीत.''

लॅप्रो ओबेसो सेंटरच्या आहारतज्ज्ञ राधिका शहा म्हणाल्या, 'उन्हाळ्यात जेवण जात नसल्याने वेगवेगळ्या भाज्या घालून पराठे, कटलेट, पॅटीस करावे. त्यातून शरीराला पोषणमूल्य मिळेल. शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. त्याबरोबरच द्राक्षे, कलिंगड, खरबूज अशी जास्त पाणी असलेली फळे खावीत.''

असा असावा उन्हाळ्यातील आहार
- पचायला हलका आहार घ्या
- ज्वारी, नाचणी, मूग अशी धान्ये, गायीचे दूध, वरण-भात आरोग्यासाठी उत्तम
- हंगामी फळे खावीत
- ताक, दही, शहाळे, नीरा, लिंबू पाणी, विविध सरबते प्यावीत
- काकडी, कांदा, हिरव्या भाज्या, पुदिना यांचे आहारातील प्रमाण वाढवा
- भरपूर पाणी प्या
- झोपण्याच्या पूर्वी किमान तीन ते चार तास जेवण करा

आहारात का बदल करा
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण वेगाने कमी होते. भूक मंदावते, थकवा येतो, अस्वस्थ वाटते. हा त्रास कमी करण्यासाठी आहारात योग्य बदल करणे आवश्‍यक असते.

Web Title: Take a diet reduced by more than