रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्यांनो सावधान; सरकार मुसक्या आवळणार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

रेमडेसिव्हिर औषधांच्या पुरवठ्याबाबत आणि कोरोना उपाययोजनांबाबत स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार लक्ष ठेवून आहेत. रुग्णांना गरज भासल्यासच रेमडेसिव्हिर द्यावे. रुग्णांच्या नातेवाईकांनीही विनाकारण डॉक्टरांकडे आग्रह धरू नये.

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी निश्चित दरापेक्षा जादा दर आकारू नये. जादा दर आकारल्यास संबंधित रुग्णालयांवर आणि रेमडेसिव्हिर औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले. 
येथील विधानभवन सभागृहात शुक्रवारी (ता.२५) उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील कोरोनाबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला. 

काळजी घ्या, तुम्ही कोरोनावर मात करून लवकरच बरे व्हाल !

पवार म्हणाले, ''रेमडेसिव्हिर औषधांच्या पुरवठ्याबाबत आणि कोरोना उपाययोजनांबाबत स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार लक्ष ठेवून आहेत. रुग्णांना गरज भासल्यासच रेमडेसिव्हिर द्यावे. रुग्णांच्या नातेवाईकांनीही विनाकारण डॉक्टरांकडे आग्रह धरू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही महत्वाकांक्षी मोहिम सुरू केली आहे. घरोघरी जावून या मोहिमे अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्याच्या दृष्टीने तपासणी होणार आहे. या मोहिमेमुळे कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे, यातून रुग्णाला वेळेपूर्वीच उपचार मिळतील आणि रुग्ण लवकर बरा होईल. त्यामुळे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवावी.''

मानलं पठ्ठ्याला; आर्थिक अडचणीतही पैलवानांच्या मदतीला आला धावून!​

पवार म्हणाले, ''कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेत उपचारासाठीच्या सुविधांही सातत्याने वाढविण्यात येत आहेत. कोरोनाच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. कोरोनाला कुणीही सहजपणे घेऊ नये.'' 

बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, चेतन तुपे, सुनिल शेळके, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take stern action against the black marketeers of Remdesivir says Deputy CM Ajit Pawar