esakal | अबब...तळेगाव - न्हावी रस्त्याची खड्यामुळे चाळण
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्याची चाळण

अबब...तळेगाव - न्हावी रस्त्याची खड्यामुळे चाळण

sakal_logo
By
नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे- न्हावी (ता. शिरूर) या सतत रहदारीच्या रस्त्यावर गेली १५ वर्षापासून मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने ऊसाचे बागायती क्षेत्र असून, विविध प्रकारची वाहने सतत ये- जा करतात. शालेय विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, दुधवाले, शेळ्या- मेंढ्या व जनावरे आणि स्थानिक नागरिक यांची रस्त्यावर सतत वर्दळ असते. या रस्त्याच्या कडेला ग्रामदैवत श्री खंडोबाचे प्रसिद्ध मंदिर असून दर्शनासाठी येथील नागरिकांची सतत वर्दळ असते.

हेही वाचा: अटलजींच्या भाषणाची क्लीप शेअर करत वरूण गांधींचा भाजपला घरचा आहेर

या रस्त्यावर खंडोबा मंदिर, जनार्दन बुवाचा मळा, कवठीचा मळा, जेधे वस्ती, चाहुर वस्ती, भोसे वस्ती व भिमाशेत येथील ग्रामस्थ ये- जा करतात.

या रस्त्याची गेली १५ वर्षापासून बिकट अवस्था झाली असून, पाणी साठल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. येथील खड्ड्यात व पाण्यात अनेक दुचाकी, चारचाकी व इतर वाहने घसरत आहेत. अनेक वर्षापासून रस्त्याची दुरवस्था झाल्याने अनेकांना मणक्याचा त्रास सहन करावा लागतो आहे.

पावसाळ्यात तर खड्याचा अंदाज न आल्याने अनेक दुधवाले शेतकरी वारंवार घसरत आहेत. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून ग्रामस्थाना दिलासा द्यावा अशी मागणी प्रमुख ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे केली आहे. यामध्ये बाजार समितीचे माजी उपसभापती ऍड.यशवंत ढमढेरे, सुनील ढमढेरे, बाळासाहेब ढमढेरे, अविनाश ढमढेरे, सचिन ढमढेरे, गोकुळ ढमढेरे, राजेंद्र जेधे, शहाजी ढमढेरे, उमेश भुजबळ, संजय जेधे व ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे.

दरम्यान, तळेगाव ढमढेरे- न्हावी रस्ता सुधारण्यासाठी आमदार ऍड अशोक पवार यांनी निधी मंजूर केला असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या सूत्रांनी सांगितली आहे. मंजूर रस्त्याचे काम त्वरित सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

loading image
go to top