तळेगावला विकासाचे मॉडेल करू - बाळा भेगडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

तळेगाव दाभाडे (सकाळ वृत्तसेवा) - आगामी काळात तळेगावला सुरक्षित शहर करण्याबरोबरच विकासाचे मॉडेल करण्याचा आणि जनतेला दिलेल्या सर्व आश्‍वासनांची पूर्तता करण्याचा मानस आमदार बाळा भेगडे यांनी व्यक्त केला.

तळेगाव दाभाडे (सकाळ वृत्तसेवा) - आगामी काळात तळेगावला सुरक्षित शहर करण्याबरोबरच विकासाचे मॉडेल करण्याचा आणि जनतेला दिलेल्या सर्व आश्‍वासनांची पूर्तता करण्याचा मानस आमदार बाळा भेगडे यांनी व्यक्त केला.

सोमवारी (ता. 19) भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला व प्रत्यक्ष कामाला सुरवात केली. त्या वेळी पक्षातर्फे आयोजित पदभार समारंभात आमदार भेगडे बोलत होते. त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्षा जगनाडे यांचा सत्कार केला. भेगडे म्हणाले, ""नगर परिषदेतील सत्तांतर बदलाच्या नियोजनाची प्रक्रिया साडेतीन महिन्यांपूर्वीच सुरू केली होती. त्याला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. आता निवडणूक संपली असून, राजकारणविरहित विकासाचे पर्व सुरू झाले आहे.''

विकासकामांचे नियोजन करताना जनतेच्या जिव्हाळ्याचे तळेगाव-चाकण मार्गावरील उड्डाण पूल, नगर परिषद कार्यालयाजवळील रेल्वे भुयारी मार्ग, शहर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, नाट्यगृह, भाजी मंडई, क्रीडांगण विकास, मारुती मंदिर चौकातील शॉपिंग सेंटर, रेल्वे स्टेशनसाठी स्वतंत्र पाणी योजना आदी विकासकामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यातील तळेगावसह लोणावळा व आळंदी नगर परिषदा पक्षाच्या ताब्यात आल्याने जबाबदारी वाढली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांच्या माध्यमातून भरीव निधी तळेगावसाठी देण्याचा प्रयत्न राहील, असे आश्‍वासनही आमदार भेगडे यांनी दिले.

माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी शुभेच्छा दिल्या. माजी आमदार रूपलेखा ढोरे, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, माजी तालुकाध्यक्ष रामनाथ वारिंगे, सरदार दाभाडे कुटुंबातील उमाराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, सत्यशिलराजे दाभाडे, युतीचे प्रचार प्रमुख ऍड. रवींद्र दाभाडे, गणेश भेगडे, जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब काकडे, गणेश खांडगे, रवींद्र आवारे, सुनील शेळके, चंद्रभान खळदे, अनिल भांगरे, श्‍यामराव दाभाडे, इंदरमल ओसवाल, सुलोचना आवारे, रजनी ठाकूर, संगीता शेळके, ज्योती जाधव यासह आजी-माजी नगरसेवक, शिक्षण मंडळ सदस्य, नवनिर्वाचित नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी आभार मानले.

पर्यावरणाची जपणूक करण्याबरोबरच लोककल्याणकारी कारभार करण्यावर आपला भर राहील.
- चित्रा जगनाडे, नगराध्यक्षा, तळेगाव दाभाडे

Web Title: talegaon to model