सरसंघचालकांमुळे उजळले तळेगावात रस्त्यांचे भाग्य!

सुनील वाळूंज
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

तळेगाव दाभाडे - सरसंघचालक मोहन भागवत यांच्या तळेगाव शहरात जोरदार तयारी सुरू असून, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे भाग्यही त्यांच्या आगमनाच्या निमित्ताने उजळले आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया बासनात गुंडाळून नगरपालिकेने तळेगावातील रस्त्याच्या डांबरीकरणाला तातडीने सुरवात केली आहे. विशेष म्हणजे ठराव मंजूर झाल्यानंतर इतक्‍या वेगवान गतीने काम करण्याची नगरपालिकाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. 

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २) विशेष सभा झाली. यात तळेगाव-चाकण या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यावरील खड्डे बुजविणे तसेच लिंब फाटा ते जिजामाता चौक रस्त्यावर सिलकोट करणे व तळेगाव रेल्वे स्टेशन ते प्रतीकनगरपर्यंतच्या रस्त्यावर सिलकोट करणे या कामांना मंजुरी देण्यात आली. मात्र तांत्रिक मंजुरी, निविदा प्रक्रिया, निविदा मंजुरी, वर्क ऑर्डर या प्रक्रिया राबविण्यासाठी काही कालावधी अपेक्षित असतो. मात्र मोहन भागवत यांच्या तळेगाव दौऱ्यामुळे या सर्व प्रक्रियांना बगल देत नगर परिषद प्रशासनाच्या केवळ तोंडी आदेशावर हे काम तातडीने सुरू  करण्यात आल्याचे बोलले जाते. या बाबत नगरअभियंता नितीन अनगळ यांना विचारणा केली असता त्यांनी रस्त्याचे काम सुरू झाल्याचे मान्य केले; मात्र कायदेशीर प्रक्रियेबाबत मुख्याधिकाऱ्यांना विचारण्याची विनंती केली. 

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी काम सुरू झाले असल्याचे मान्य केले. मात्र तांत्रिक बाबींसंदर्भात प्रशासनास विचारणा करावी, असे सांगितले. यासंदर्भात मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी काम सुरू असल्याचे मान्य केले; मात्र काम सुरू करण्याच्या प्रक्रियेबाबत मौन बाळगले. या वेळी त्यांच्या दालनात बसलेल्या दोन महिला नगरसेविकांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासाठी तातडीने काम सुरू केल्याचे सांगितले.

‘भागवतांचे पाय चाकण रस्त्याला लागू द्या’
गेली अनेक वर्षे खड्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत असलेल्या तळेगाव-चाकण रस्त्यावरील खड्डे सातत्याने पाठपुरावा करूनही संपूर्ण बुजविले गेले नाहीत. मोहन भागवत यांच्या तळेगाव दौऱ्यामुळे   सर्व नियम धाब्यावर बसवून तसेच कोणत्याही मंजुरीची वाट न पाहता डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे ‘भागवतांचे पाय तळेगाव-चाकण रस्त्यावर लागू द्या,’ अशी भावना काही राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिकही व्यक्त करीत आहेत.

Web Title: talegaon news mohan bhagwat