Pune News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामास अखेर मुहूर्त

पुणे जिल्ह्यातील तीन उन्नत महामार्गांच्या निविदा पटलावर
talegaon shikrapur highway work pune district tender traffic jam
talegaon shikrapur highway work pune district tender traffic jamSakal

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण-शिक्रापूर ५४८-डी या राष्ट्रीय महामार्गासह पुणे ते शिरुर आणि नाशिक फाटा ते खेड या तीन उन्नत महामार्गांच्या निविदा पटलावर झळकल्या असून,वारंवार होणारे अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे बहुचर्चित आणि प्रलंबित अशा या महामार्गाच्या कामास अखेर मुहूर्त लागला आहे.

विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये यावरुन श्रेयवाद चालू असला तरी,सदर काम लवकरच सुरु होण्याच्या आशेने तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गालगतच्या गावांमधील नागरिकांसह वाहतूकदारांमध्ये उल्हासाचे वातावरण आहे.

नव्यानेच विकसित झालेल्या औद्योगिक पट्ट्यातील तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गांवर मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या अवजड वाहनांची प्रचंड रहदारी असते.साधारणतः पाच वर्षांपूर्वी तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता ५४८डी या राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला.

त्यानंतर नुसत्या कोटींच्या निधीच्या कागदी घोषणा झाल्या.मात्र,गतवर्षीपासून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने त्रयस्थ सल्लागार संस्थेमार्फत सदर महामार्गाचे सर्वेक्षण करुन विस्तृत प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी सादर केला होता.

त्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्राधिकरणाने तत्परता दाखवत गेल्या २१ डिसेंबरला या महामार्गाच्या कामासाठी निविदा प्रक्रियादेखील सुरु केली आहे. अस्तित्वातील तळेगाव-चाकण टप्प्यातील २५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्वावर चौपदरीकरण करुन त्यावर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याच्या कामाची २,४५५.७८ कोटी रुपयांची निविदा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे.

सोबतच चाकण ते शिक्रापूर टप्प्यातील २८ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्वावर चौपदरीकरण करुन त्यावर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याच्या कामाची २,७७८.५३ कोटी रुपयांची निविदा देखील प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे.सदर निविदांच्या अंदाजपत्रकांमध्ये वस्तू सेवा कर वगळून उपयोगिता स्थलांतरित करणे आणि रॉयल्टीचा समावेश आहे.

येत्या ७ फेब्रुवारीपर्यंत मुदत असलेली ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच या कामाचा कार्यादेश निघून प्रत्यक्ष कामास सुरवात होण्याची शक्यता आहे.त्यासाठी कदाचित तळेगाव-चाकण रस्त्यावरील दैनंदिन वाहतूक काही दिवस पर्यायी मार्गांनी वाळवावी लागेल.सुरुवातीला अस्तित्वातील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जरी झाले तरी काही प्रमाणात वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राजकीय अनस्थेपायी इतकी वर्षे रखडलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु केल्याबद्दल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे आम्ही आभार मानतो.

गेली तीन चार वर्षे कृती समितीने या महामार्गाच्या समस्यांसाठी जेवढे राजकारण विरहित अर्ज,विनंत्या,आंदोलने केली तेवढी कदाचित इतर कुणीही केली नसतील.आता श्रेयवादात पडण्यापेक्षा संबंधित राजकीय मंडळींनी प्रत्यक्ष काम कसे सुरु करता येईल यासाठी पाठपुरावा करावा.-नितीन गाडे (अध्यक्ष, तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती)

सदर प्रकल्पाची निविदा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वेबसाईटवर २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली आहे.त्यानंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या ठरलेल्या मानक कार्य पद्धतीनुसार पात्र कंत्राटदारास सदर प्रकल्पाचा कार्यादेश प्रदान करण्यात येईल.

- अनिकेत यादव (तांत्रिक व्यवस्थापक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण,पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com