बापरे! भाजी विक्रेत्यांना कोरोना, अनेकांनी केली खरेदी... 

plasma-therapy
plasma-therapy

तळेगाव ढमढेरे (पुणे) : शिरूर तालुक्‍यातील तळेगाव ढमढेरे येथील भाजी विक्रीची व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्याकडून अनेकांनी भाजी खरेदी केली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी 12 जणांच्या घशातील द्राव तपासणीसाठी आज "एनआयव्ही'कडे पाठविण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी सांगितली. 

तळेगाव ढमढेरे येथे गेल्या आठवड्यात एकाच कुटुंबात 4 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, त्यातील एका ज्येष्ठ महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, उर्वरित तिघांवर पुणे येथे उपचार चालू असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे. परंतु, त्यांच्या संपर्कातील आणखी 12 जणांचे घशातील द्रवाचे नमुने सोमवारी तपासणीसाठी नेले असून, त्याचा अहवाल 2 दिवसांत येणार असल्याचे डॉ. घोरपडे यांनी सांगितले. 

या चौघांना कोरोनाची बाधा पुण्यातूनच झाल्याचे आरोग्य विभाग व ग्रामस्थांचे मत आहे. लॉकडाउनच्या काळात मृत महिलेची दोन्ही मुले व सून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होती. दोन्ही मुले स्वतःच्या चारचाकी गाडीत दररोज पुण्यात भाजी विक्रीसाठी जात होते, तर सून गावात राहत्या घराजवळ भाजी विकत होती. त्यावेळी महिला घरात आजारी होती. भाजी विकताना या दोन्ही मुलांना पुण्यात कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्याची लागण घरातील त्यांच्या आजारी आईला झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर आईचा आजार बळावल्याने मुलांनी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. परंतु, जास्तच त्रास झाल्याने पुणे येथील औंध येथे नेले. मात्र, तेथे उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर भाजी विक्रेते दोन्ही मुले व सुनेला कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह अहवाल आला. 

पुण्यातून दररोज भाजी विकून घरी येणाऱ्या या कुटुंबाकडे स्थानिक ग्रामस्थांनी दुर्लक्ष केले. तसेच, गावातही त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असल्याने अनेकांनी भाजी नेली आहे. प्रशासनाने लॉकडाउनच्या काळात गावातील सर्व दुकाने अद्यापपर्यंत बंदच ठेवली असून, संचारबंदीचे व सोशल डिस्टन्सचे नियम पाळले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले. परंतु, भाजी विक्रीच्या पुण्यातील संसर्गाच्या कनेक्‍शनमुळे गावात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले. इतक्‍या दिवस पाळलेले नियम पाण्यात गेल्याची भावना व्यक्त होत आहे. 

दरम्यान, शासनाने गाव प्रतिबंधित क्षेत्रात असल्याचे घोषित केले आहे. गावात विविध उपाय योजत असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष तलाठी डी. एस. भराटे यांनी केले आहे. 


   
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com