टॅंकरच्या पाण्यासाठी कासावीस

पराग जगताप
बुधवार, 16 मे 2018

ओतूर - जुन्नर तालुक्‍यातील सात गावे व ७७ वाड्यावस्त्यांत पाणी टंचाई असून, या तहानलेल्या गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. मात्र, ती लालफितीच्या कारभारात अडकून 
पडली असून, मंजुरी नसल्यामुळे मे महिना अर्धा संपत आला; तरी तालुक्‍यात एकही टॅंकर चालू झालेला नाही.

ओतूर - जुन्नर तालुक्‍यातील सात गावे व ७७ वाड्यावस्त्यांत पाणी टंचाई असून, या तहानलेल्या गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. मात्र, ती लालफितीच्या कारभारात अडकून 
पडली असून, मंजुरी नसल्यामुळे मे महिना अर्धा संपत आला; तरी तालुक्‍यात एकही टॅंकर चालू झालेला नाही.

तालुक्‍याच्या आदिवासी गावामध्ये तीव्र उन्हाळा जाणवत असून, पाणी टंचाईच्या छळा नागरिकांना जाणवू लागल्या आहेत. टॅंकर लवकर मिळावा म्हणून मार्च महिन्यातच टॅंकरचे मागणी प्रस्ताव काही गावांकडून पंचायत समितीत पाठवण्यात आले होते. मात्र, मे महिना अर्धा संपत आला; तरी जुन्नर तालुक्‍यातील तहानलेल्या सात गावात व ७७ वाड्यावस्तीतील अंदाजे १६ हजार ७५४ लोकवस्ती टॅंकरच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने कागदोपत्री जुन्नर तालुका टॅंकरमुक्त करण्याचा घाट घातला आहे का, अशी शंका तहानलेल्या गावातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

जुन्नर तालुक्‍यातील कोपरे, मुथाळने, जळवंडी, अंजनावळे, आलमे, नळावणे, शिंदेवाडी, आणे या गावांसह तालुक्‍यातील छोट्या मोठ्या ७७ वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यातील काही गावांनी मार्चमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरसाठी मागणी केली होती. मात्र, मागणी अर्ज बदलले व अर्जातील त्रुटीमुळे सर्व मागणी अर्ज परत मागवण्यात आले. त्यामुळे ११ एप्रिलला तालुक्‍यात झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत एकही टॅंकर मागणी प्रस्ताव सादर झाला नाही. त्यानंतर पंचायत समितीकडून टॅंकर मागणी प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवण्यात आले.

तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी टॅंकरचे मागणी प्रस्ताव मंजुरीसाठी पुढे पाठवले आहेत. मात्र, अद्याप टॅंकर मागणी प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी मिळालेली नाही.

मुथाळणे गावच्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरीला सध्या पंधरा दिवस पुरेल एवढे पाणी आहे. मात्र, पुताचीवाडी, काकडाची नळी, गुडघ्याची वाडी, जोश्‍याचीवाडी, शैलाचा माळ, शिंदे फाटा आणि इतर वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

लग्न, समारंभ व दशक्रियेसाठी खासगी टॅंकर मागवावे लागत आहेत. ग्रामपंचायतीकडून मार्चमध्येच पंचायत समितीला टॅंकर मागणीचा प्रस्ताव देण्यात आला होता.

मात्र, लालफितीच्या कारभारात मे महिना निम्मा संपत आला तरीसुद्धा टॅंकर चालू झाला नाही. काही भागात महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना दिवसभर फक्त पाणी मिळवण्याचे काम करावे लागत आहे.

नागरिकांची पायपीट
मांडवे- मुथाळण्याच्या सरपंच योगिता दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र तळपे व सामाजिक कार्यकर्ते सखाराम दाभाडे म्हणाले, ‘‘कोपरे, मांडवे- मुथाळने व जांभूळशी या परिसरातील वाड्यावस्त्यात हजारो आदिवासी जनतेचे पाणी टंचाईमुळे हाल होत आहेत. जे उपलब्ध पाणी आहे, ते हिरवेगार व दूषित झाले असून, शिवकालीन टाक्‍या कोरड्या पडल्या आहेत. अशुद्ध पाण्यामुळे साथीचे रोग बळावण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.’’ 

Web Title: tanker water shortage