टीडीआर घोटाळ्याचे पुरावे द्या! - एकनाथ पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

पिंपरी - टीडीआर हा जमीन संपादनानंतर संबंधित जागामालकाला मिळणारा मोबदला आहे. त्यात घोटाळा झाला असेल, तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी जाहीरपणे सांगावे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. टीडीआरमधील घोटाळे बाहेर काढून संबंधितांवर कारवाई करायला राष्ट्रवादीला कोणी राखले आहे. वाघेरे पाटील हे दुसऱ्याच्या तालावर नाचत आहेत. आम्ही जसे महापालिकेतील भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर मांडले, तसे वाघेरे पाटील यांनी टीडीआरमधील भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेला द्यावेत, असे आव्हान भाजप नेते एकनाथ पवार यांनी दिले आहे. 

या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘‘वाघेरे पाटील यांनी महापालिकेत टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असूनही त्यांनी विनापुरावा आरोप करून प्रशासनावर आपली पकड नसल्याचेच दाखवून दिले आहे. भारतीय जनता पक्षाने महापालिकेतील प्रत्येक भ्रष्टाचाराचे पुरावे दिले आहेत. प्रशासनाने केलेल्या चौकशांमध्ये देखील भ्रष्टाचार असल्याचे सिद्ध झाले.

गोरगरिबांसाठी राबविलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात खऱ्या लाभार्थ्यांना हाकलून लावून बोगस लाभार्थ्यांना राष्ट्रवादीने घुसविले. या प्रकरणात महापालिकेनेच पोलिसांत फौजदारी दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीचे पितळ उघड पडले आहे.’’

विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्ती खरेदी, गॅस शवदाहिनी खरेदीतही करदात्यांचे पैसे लुटल्याचे शहरातील जनता विसरलेली नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी दुसऱ्याच्या तालावर आरोप करत आहेत. पुराव्यासह एकतरी उदाहरण समोर आणायला हवे होते. तसे न करता मोघम आरोप करून स्वतःवरच त्यांनी शिंतोडे उडवून घेतले आहेत, असेही पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते व माजी महापौर योगेश बहल, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, जगदीश शेट्टी, उल्हास शेट्टी यांनीही महापालिकेकडून काही लाख चौरस फुटांचा टीडीआर घेतलेला आहे. त्याचे पुरावे महापालिकेत उपलब्ध आहेत. त्यामुळे हे सर्व जण सुद्धा टीडीआर घोटाळ्यात सामील आहेत का? हे वाघेरे पाटील यांनी जाहीर करावे. 
पिंपळेगुरव, सांगवी, पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख, वाकड या भागातील नागरिकांना विकासाची जाण आहे. तेथील नागरिकांनी विकासासाठी जमिनी देऊन आपल्या परिसराचा कायापालट करून घेतला. पिंपरीगाव आणि या भागात विकासाची मोठी तफावत का दिसते, याचे वाघेरे पाटील यांनीच आत्मपरीक्षण करावे, असाही टोला पवार यांनी लगावला आहे.

Web Title: TDR scam give evidence