आखरवाडीत शिक्षक दांपत्याने बुजविले खड्डे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

आखरवाडी (ता. खेड) येथे शिरूर - भीमाशंकर राज्य मार्गावर पडलेले खड्डे शिक्षक दांपत्याने पुढाकार घेत येथील तरुणांच्या सहकार्याने बुजवण्यास सुरवात केली अन्‌ दोन तासांच्या श्रमदानातून खड्डे बुजविले. 

चास (पुणे) : आखरवाडी (ता. खेड) येथे शिरूर - भीमाशंकर राज्य मार्गावर पडलेले खड्डे शिक्षक दांपत्याने पुढाकार घेत येथील तरुणांच्या सहकार्याने बुजवण्यास सुरवात केली अन्‌ दोन तासांच्या श्रमदानातून खड्डे बुजविले. 

आखरवाडी- चासजवळ वाडा रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले होते. ते प्रवाशांना व वाहनचालकांना मरणाच्या खाईत घेऊन जात होते. याठिकाणी आजपर्यंत या खड्यांमध्ये कित्येक वाहने पडून अनेक अपघातही घडून आलेले होते. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे याच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मागील आठवड्यात मोटरसायकल आदळून पडल्याने अत्यवस्थ व जखमी झालेल्या तरुणांना पाहून बारापाटी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक व शिक्षक असणाऱ्या संजय नाईकरे व वैशाली नाईकरे या शिक्षक दांपत्याने सुटीच्या दिवशी हे जीवघेणे खड्डे स्वतःच बुजवण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे रविवारी सुटीच्या दिवशी सकाळी त्यांनी खोरे व फावडे घेऊन दगड व मुरूम, माती टाकून हे खड्डे बुजविण्यास सुरवात केली. 

सुमारे अर्धा पाऊण तास हे अवजड काम करणाऱ्या उभयतांकडे त्रयस्थपणे पाहात अनेक जण पुढे निघून जात होते; परंतु आखरवाडीतील काही युवकांनी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने पाहता पाहता आठ, दहा जण जमा झाले. शिक्षकांच्या सामाजिक जाणिवेला संस्कारक्षम युवकांची सकारात्मक शक्ती येऊन मिळाली. पुढील दोन अडीच तासांत या रस्त्यावरील मोठमोठे तीन-चार खड्डे दगड व मुरूम टाकून पूर्णपणे बुजविण्यात आले. 

या खड्ड्यांबाबत "सकाळ'ने वेळोवेळी जाणीव करून दिली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्ड्यांत केवळ माती भरली होती ती दुसऱ्या दिवशीच वाहून गेल्याने खड्डे जैसे थे होते. मात्र, शिक्षक दांपत्याने केलेल्या या कामाचे सर्वत्र स्वागत होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्ड्यांची दखल घेतली नव्हती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher couple dug pits