विद्या परिषदेतील ‘धन’ धूळ खात

Education
Education

पुणे - राज्यातील अनेक शाळांमधील शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी केलेली साडेतीनशेहून अभ्यासपूर्ण संशोधने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत (विद्या परिषद) धूळ खात पडून आहेत. त्यांचे ना दर्जात्मक विश्‍लेषण झाले, ना अन्य शिक्षकांना ती मार्गदर्शनासाठी परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, तसेच शाळांचे प्रश्‍न घेऊन शिक्षकांनी एखादा विषय घेऊन कृती संशोधन आणि अधिकाऱ्यांनी लघुसंशोधन करावे, असे विद्या परिषदेमार्फत सांगितले जाते. त्याला प्रतिसाद देत शिक्षण विभागातील हे घटक विषय निवडून त्याचा अभ्यास आणि संशोधन करतात. त्यातील प्रश्‍न वा समस्यांवर उपाय शोधतात. हे लघुशोध निबंध तयार करून प्रकल्प अहवालाच्या रूपात परिषदेला सादरही करतात; पण त्याची शीर्षके केवळ एका वहीत नोंदविली जातात आणि नंतर ती परिषदेतील कपाटात धूळ खात पडून राहतात.

परिषदेच्या संशोधन विभागात १९८४ ते २०१७ या काळात शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी केलेली सुमारे ३८९ संशोधने पडून आहेत. त्याच्या केवळ नोंदी केलेल्या आहेत. परंतु त्याचे दर्जात्मक मूल्यांकन झालेले नाही. तसेच, दर्जेदार संशोधने अन्य शाळा वा शिक्षकांच्या अभ्यासासाठी उपलब्धदेखील करून देण्यात आलेली नाहीत. याबाबत परिषदेच्या संशोधन विभागातील अधिकारी डॉ. गीतांजली बोरुडे म्हणाल्या, ‘‘अभ्यासासाठी येथे (पुण्यात) येणाऱ्या शिक्षकांना ती माहिती घेण्यासाठी देतो.’’  

परिषदेचे अधिकारी शाळांमधील नवोपक्रमाची बॅंक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची भाषा करीत असताना विद्यार्थी आणि शाळांच्या समस्येवर केलेली संशोधनांवरील धूळ मात्र झटकलेली नाही. त्याचे डिजिटायझेशन करून ते संकेतस्थळावर अपलोडही केलेले नाही. यामुळे या संशोधनकार्याची माहिती घ्यायची असेल, तर शिक्षकांना पुण्यात यावे लागेल. त्यापेक्षा ते  संकेतस्थळावर दिल्यास सर्वांना त्याचा आधार घेता येईल आणि राज्यातील प्रश्‍नही समोर येतील, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले आहे. यासंबंधी परिषदेचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

काय आहेत संशोधने? 
विद्यार्थ्यांच्या वाचन, अध्ययन क्षमता विकसित होण्यासाठी उपक्रम आणि त्याचा अभ्यास, मूकबधिर विद्यार्थ्यांचे प्रश्‍न, निबंध लेखन कौशल्य, विशेष गरजा असलेल्या मुलांना येणाऱ्या अडचणी, विद्यार्थिनींना प्रभावी व्यावसायिक शिक्षण कसे देता येईल, गणित विषय आकलन आणि विज्ञानाचे प्रयोग करताना येणाऱ्या अडचणी अशा अनेक वैविध्यपूर्ण विषयांवर लघु आणि कृती संशोधने करण्यात आलेली आहेत.

विद्या परिषदेकडे आलेल्या शिक्षकांच्या संशोधन कार्याबाबत परिषदेच्या संचालकांशी चर्चा करणार आहे. त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन योग्य कार्यवाही केली जाईल.
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com