शिक्षक भरतीवर आज निर्णय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पिंपरी - महापालिकेच्या शिक्षण विभागात गेल्यावर्षीच्या संच मान्यतेनुसार १९३ जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम झाला आहे. ‘पवित्र प्रणाली’तून शिक्षक भरतीस अद्याप प्रारंभ झालेला नाही. जिल्हा परिषदेतून काही शिक्षक महापालिकेच्या सेवेत वर्ग करण्यासाठी भाजपचा एक गट आग्रही आहे. याचा ऐनवेळचा प्रस्ताव गुरुवारी (ता.२०) सर्वसाधारण सभेत चर्चेला येणार आहे.

जिल्हा परिषदेतील शिक्षक भरतीसाठी मोठी रक्कम घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला होता. त्यामुळे महापालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. याबाबत प्रशासनाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसून उद्याच्या सभेत प्रस्ताव मंजूर झाल्यास प्रशासन आपली भूमिका मांडणार आहे. 

जिल्हा परिषदेतून १०५ शिक्षक घेणार असल्याची चर्चा असून, त्यांची नावे सर्वसाधारण सभेत मांडणार नसल्याचे समजते. सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी मांडलेला प्रस्ताव चर्चेला येणार असल्यामुळे ती नावे ठरवता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ‘पवित्र प्रणाली’च्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचे जाहीर केले आहे. ऑनलाइन पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

मात्र, २००४ पर्यंतचे सुमारे २१५ प्रस्ताव ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. २०१७ नंतरच्या १०० प्रस्तावांची छाननी सुरू आहे.  छाननीत पात्र ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडे सेवा वर्गीकरणासाठी प्रत्येकी ५ ते ८ लाख रुपयांचा भाव फुटल्याचा आरोप शिक्षण समितीतील काही सदस्यांसह विरोधी पक्षनेते साने यांनी केला होता. त्यातच हा विषय ऐनवेळी दाखल केल्यामुळे त्याची चर्चा झाली होती. महापालिकेचे कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांच्या निधनामुळे नोव्हेंबर महिन्यातील सभा तहकूब करण्यात आल्याने उद्याच्या सभेत हा विषय मांडण्यात येणार आहे.

सरकारने घातलेली शिक्षक भरतीची बंदी यावर्षी उठल्यामुळे २०१७ नंतर आलेल्या प्रस्तावांना प्राधान्य देऊन भरती करण्यात येणार आहे. 
- प्रा. सोनाली गव्हाणे, सभापती, शिक्षण समिती

Web Title: Teacher Recruitment Decission Municipal