शिक्षक भरती अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पुणे - शिक्षक भरतीसाठी असणाऱ्या पवित्र पोर्टलवर सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना ‘नॉन क्रिमिलेअर’चा पर्यायच उपलब्ध झालेला नव्हता, तो आता उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, अर्ज भरताना त्रुटी आल्याने अंतिम मुदतीपूर्वी नोंदणी करू न शकलेल्या उमेदवारांना मुदतवाढ देण्यात येणार आहे. याबाबतची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार 
आहे.

आरक्षण लागू झाल्यानंतर शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलमार्फत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज अद्ययावत करण्याची सुविधा देण्यात आली होती. यामध्ये अर्ज अद्ययावत करताना उमेदवारांना ‘नॉन क्रिमिलेअर’चा पर्याय येत नव्हता. त्यासंदर्भात उमेदवार तक्रारी करीत होते. या नोंदणीसाठी रविवारपर्यंत अंतिम मुदत होती. त्यामुळे या नोंदणीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती. उमेदवारांचे नुकसान होऊ नये, म्हणून अर्जात त्रुटी आढळलेल्या उमेदवारांना मुदतवाढ देण्यात येईल, असे ‘बालभारती’चे संचालक डॉ. सुनील मगर यांनी स्पष्ट केले.

पवित्र पोर्टलवर सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग गट काही दिवसांपूर्वी समाविष्ट करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या गटातून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आरक्षणानुसार उमेदवारांनी अर्ज भरल्यास त्याचा अर्ज स्वीकारला जात नव्हता, अशा तक्रारी उमेदवारांनी केल्या होत्या, त्याची दखल घेतल्याचे डॉ. मगर यांनी सांगितले. दरम्यान, पवित्र पोर्टलचे सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज भरताना अडचणी येत होत्या, असेही काही उमेदवारांनी सांगितले.

पवित्र पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित अधिकारी काम करीत आहेत. त्याशिवाय शिक्षक भरतीचा अर्ज भरताना अडचणी आलेल्या उमेदवारांसाठी एकत्रित मुदतवाढ देण्यात येईल. जेणेकरून उमेदवारांना अर्जातील माहिती भरता येईल. ही मुदतवाढ लवकरच जाहीर करण्यात येईल.
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त

Web Title: Teacher recruitment form