शिक्षकांचाही ‘दुष्काळ’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

पुणे - जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या १ हजार ११७ जागा रिक्त आहेत. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात हीच स्थिती कायम आहे. यामुळे सुमारे ७८ शाळा बिनशिक्षकी झाल्या आहेत. सध्या या शाळांमध्ये शेजारील शाळांमधील शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात रिक्त असलेल्या जागांमध्ये मुख्याध्यापकांच्या ११६ जागा, पदवीधर शिक्षकांच्या २५९ आणि उपशिक्षकांच्या ८५८ जागांचा समावेश आहे. 

राज्य सरकारने राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांबाबतचा जिल्हानिहाय तपशील नुकताच जाहीर केला आहे. त्यात ही बाब उघडकीस आली आहे. प्राथमिक शिक्षकांच्या भरतीचे आणि बदल्यांचे अधिकार जिल्हा परिषदेला आहेत. मात्र, राज्याच्या ग्रामविकास आणि शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या या अधिकारावरच अतिक्रमण केले आहे. राज्य सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या आणि भरतीचे अधिकार अघोषितपणे जिल्हा परिषदेकडून काढून घेतले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे बदली आणि भरतीचे अधिकार केवळ नावापुरतेच शिल्लक राहिले आहेत. यामुळे राज्य सरकार भरती करेल, तेव्हाच या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

सरकारने गेल्या वर्षी थेट राज्य स्तरावरूनच शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या केल्या. शिवाय शिक्षकांच्या रिक्त जागाही थेट राज्य स्तरावरूनच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यानुसार ही भरती प्रक्रिया सुरूही केली आहे. मात्र, त्यानुसार नवीन शिक्षकांना नियुक्ती आदेश मिळण्यास किमान मार्च अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठीही आणखी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 

जिल्ह्यात मुख्याध्यापकांची ४०७, पदवीधर शिक्षकांची एक हजार ८१५ आणि उपशिक्षकांची दहा हजार १८२, अशा एकूण ११ हजार ९९७ जागा मंजूर आहेत. त्यापैकी सध्या फक्त दहा हजार ८८० जागा भरलेल्या आहेत. 

 - जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची संख्या - ३७१६
 - मुख्याध्यापकांची मंजूर पदे - ४०७
 - पदवीधर शिक्षकांच्या एकूण जागा - १८१५ 
 - उपशिक्षकांची एकूण पदे - १० हजार १८२ 
 - सध्या रिक्त असलेल्या जागा - १ हजार ११७

Web Title: teacher Shortage in ZP School

टॅग्स