शिक्षकांच्या समर्पणाचे वाबळेवाडी उदाहरण - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

शिक्रापूर - ‘शिक्षकांनी स्वत:ला शाळेत ‘गाडून’ घेतल्यावर काय होते, याचे राज्यातील मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. त्यामुळे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे आणि येथील सर्व शिक्षकांपुढे मी विनम्र नतमस्तक होतो,’’ अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी कौतुक केले.

शिक्रापूर - ‘शिक्षकांनी स्वत:ला शाळेत ‘गाडून’ घेतल्यावर काय होते, याचे राज्यातील मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. त्यामुळे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे आणि येथील सर्व शिक्षकांपुढे मी विनम्र नतमस्तक होतो,’’ अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी कौतुक केले.

मुंबईतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे वाबळेवाडीसह राज्यातील तेरा आंतरराष्ट्रीय ओजस शाळांचे उद्‌घाटन झाले. या वेळी वाबळेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात बापट बोलत होते.

या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, प्रांताधिकारी भाऊ गलांडे, आमदार बाबूराव पाचर्णे, सभापती विश्वास देवकाते, उपसभापती जयमाला जकाते, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे व रेखा बांदल, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, सरपंच जयश्री भुजबळ, माजी सरपंच रामभाऊ सासवडे आदी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, ‘‘चार वर्षांपूर्वी ३४ पटाच्या या शाळेत आज २५०० विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट आहे, हेच या शाळेचे दर्जापत्रक आहे.’’ मांढरे म्हणाले, ‘‘या शाळेची भुरळ केवळ ग्रामस्थांनाच नाही, तर पालक, जिल्हा परिषद, पालकमंत्री आणि राज्यालाही पडली आहे.’’ 

पाचर्णे व बांदल म्हणाले, ‘‘शिक्षणासाठी पूर्वी शहरात जाण्यासाठी पालक धडपडत. मात्र, आता शहरातील पालक वाबळेवाडीत प्रवेशासाठी प्रयत्न करतात, हे येथील शिक्षकांचे, ग्रामस्थांचे आणि नव्या अभ्यासक्रमाचे यश आहे.’’ सतीश वाबळे यांनी सूत्रसंचालन केले.

‘सर्वांत सुंदर स्वच्छतागृह’ 
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शाळेच्या स्वच्छतागृहाची पाहणी केली. कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगितले की, मी आतापर्यंतच्या आयुष्यात ज्या- ज्या शाळांच्या स्वच्छतागृहांमध्ये गेलो, त्यातील सर्वांत स्वच्छ आणि सुंदर स्वच्छतागृह हे वाबळेवाडी शाळेचे होते. यावरूनच या शाळेचा दृष्टिकोन समजत आहे.

पदाधिकाऱ्यांच्या दांडीने नाराजी 
वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील ‘ओजस’ शाळेच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांनी दांडी मारली. याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांनी नाराजी व्यक्त केली असून, संपूर्ण जिल्हा परिषद कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे,’’ अशी टिप्पणी केली.

ते म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेच्या दृष्टीने एवढा मोठा कार्यक्रम असताना या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे अन्य कार्यक्रम असतील, असे वाटते. हे सर्व कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत आहेत. अशा कार्यक्रमांकडे मी राजकारण म्हणून कधीच पाहत नाही आणि अन्य कुणीही तसे पाहू नये.’’

‘‘वाबळेवाडी शाळा ही राज्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी ऊर्जा केंद्र आहे. या शाळेचे अनुकरण जिल्ह्यातील इतर जिल्हा परिषद शाळेत करणार आहे,’’ असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी जाहीर केले. 

ते म्हणाले, ‘‘वाबळेवाडी शाळेत शिक्षकाला बदली होऊन येण्यासाठी कठोर प्रशिक्षण पार पाडावे लागणार आहे.’’

Web Title: Teacher Vabalewadi School Girish Bapat