esakal | केंद्राचे ‘निष्ठा’ वाढविणार शिक्षकांचे अध्यापन कौशल्य
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : केंद्राचे ‘निष्ठा’ वाढविणार शिक्षकांचे अध्यापन कौशल्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सरकारी शाळा म्हटलं की, शिक्षकांचे अध्यापन कौशल्य विकसित करण्याचे प्रशिक्षण हमखास होणारंच. पण याला आतापर्यंत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक नेहमीच अपवाद राहत असत. मात्र प्राथमिक शाळांमधील शिक्षक प्रशिक्षणाच्या धर्तीवर आता केंद्र सरकारने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठीही `निष्ठा’ नावाचा प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला आहे. याच्या माध्यमातून या शिक्षकांना अध्यापन कौशल्याचे आॅनलाअइन प्रशिक्षण दिले जाणार आहे.

केंद्र सरकारने निष्ठा या एकात्मिक प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरवात २१ आॅगस्ट २०१९ ला केली आहे. यानुसार २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात प्राथमिक शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आले. दुसरा टप्पा हा मंगळवारपासून (ता.५) सुरु केला आहे. या टप्प्यात आता राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सोमवारी (ता.४) याबाबतचा आदेश काढला आहे. कोरोना परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या देशातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांमध्ये अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा समावेश केला आहे. हे प्रशिक्षण राष्ट्रीय स्तरावरील ‘दिक्शा’ (diksha) या प्रणालीच्या माध्यमातून दिले जाणार असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक एम. डी. सिंह यांनी याबाबत काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा: मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नॅशनल इनिशिएटिव्हज फॉर स्कूल हेडस् ॲंड टीचर्स होलिस्टिक ॲडव्हान्समेंट (निष्ठा) हा एकात्मिक प्रशिक्षण कार्यक्रम निश्‍चित केला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकेल, अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे.

या प्रशिक्षणात एकूण १९ घटकसंचांचा (मोड्यूल्स) समावेश केला आहे. यापैकी १२ घटकसंच हे सामान्य अभ्यासक्रमावर तर, उर्वरित सात हे घटकसंच हे विषयनिहाय घटकसंचावर आधारित असणार आहेत.

सामान्य अध्यापनावर आधारित घटकसंच

 1. अभ्यासक्रम व अध्ययनकेंद्रित सर्वसमावेशक शिक्षण

 2. सुरक्षित व निकोप शालेय वातावरण निर्मितीसाठी वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्याचे विकसन

 3. द्वितीय स्तरातील शिक्षण ः मार्गदर्शन व समुपदेशन

 4. शालेय नेतृत्व ः संकल्पना व उपयोजन

 5. शाळा आधारित मूल्यांकन

 6. शालेय शिक्षणातील पुढाकार

 7. शिक्षणातील विविध समस्या

 8. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे अध्ययन, अध्यापन व मूल्यांकन एकात्मीकरण

 9. व्यावसायिक शिक्षण

 10. शाळांमधील आरोग्य व स्वास्थ्य

 11. कला एकात्मिक अध्ययन

 12. खेळणीआधारित अध्यापनशास्त्र

विषयनिहाय अध्यापनशास्त्र आधारित घटकसंच

- इंग्रजी, हिंदी, उर्दू, संस्कृत, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे.

loading image
go to top