"तेजस'ने घेतला अखेरचा श्‍वास 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

वयाच्या सातव्या वर्षी गुजरात येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून "तेजस' आणि "सुब्बी' या सिंहांच्या जोडीला राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले होते. "तेजस' पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरला होता.

कात्रज (पुणे) : अर्धांगवायू झाल्यानंतर मृत्यूशी झुंज देणाऱ्या "तेजस' या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील सिंहाचा आज संध्याकाळी मृत्यू झाला. तब्बल चोवीस दिवस प्राणिसंग्रहालय प्रशासन करीत असलेले उपचार निष्फळ ठरवत वयाच्या नवव्या वर्षी "तेजस'ने जगाचा निरोप घेतला. 

वयाच्या सातव्या वर्षी गुजरात येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून "तेजस' आणि "सुब्बी' या सिंहांच्या जोडीला राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले होते. "तेजस' पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरला होता. प्राणिसंग्रहालयात अल्पावधीत रुळलेला आणि स्वच्छंद विहार करणाऱ्या "तेजस'च्या गर्जनेने प्राणिसंग्रहालयाला वेगळीच ओळख मिळवून दिली होती. गेल्या वर्षी 23 फेब्रुवारीला "तेजस'ला अर्धांगवायूचा पहिला सौम्य झटका आला. प्राणिसंग्रहालय प्रशासन आणि तज्ज्ञ पशुवैद्यकांनी दोन महिने केलेल्या अथक प्रयत्नांनी तेजसला मृत्यूच्या दाढेतून अक्षरशः खेचून आणले होते. त्यानंतर सावरलेला तेजस पूर्वीसारखा विहार करीत होता. 

चोवीस दिवस अथक प्रयत्न 
गेल्या महिन्यात 17 जुलै रोजी सकाळी "तेजस'ला अर्धांगवायूचा दुसरा आणि तीव्र झटका आल्याचे निष्पन्न झाले. त्याचा कमरेखालील संपूर्ण भाग त्या झटक्‍याने निकामी झाला होता. क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील दिग्रसकर, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. ना. पु. दक्षिणकर, प्राणी आरोग्य सल्लागार समितीचे सदस्य शल्यचिकित्सक डॉ. फिरोज खंबाटा, डॉ. मिलिंद मेश्राम, पशुरोग निदान व विकृती शास्त्र विभागाचे प्रा. चंद्रशेखर मोटे, सूक्ष्मजीव विभागाचे प्रा. डॉ. प्रशांत म्हसे यांनी तब्बल चोवीस दिवस अहोरात्र प्रयत्न केले होते. झटका तीव्र असल्यामुळे "तेजस'चे महत्त्वाचे अवयव निकामी झाले होते. भूक मंदावल्यामुळे "तेजस' सलाईनवर होता. प्रतिकारक्षमता संपुष्टात आल्यानंतर या गंभीर आघातातून पुन्हा उठण्याची क्षमता "तेजस'मध्ये राहिली नव्हती आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकारी, मुख्य पशुपालक, पशुपालक यांच्यासह देखभाल करणाऱ्या पथकाला "तेजस'च्या जाण्याने दुःखी केले. 

वर्षभरासाठी दत्तक 
सिंहांचे सरासरी आयुर्मान 10 ते 14 वर्षे असते. अर्धांगवायूच्या झटक्‍यांमुळेच "तेजस'वर 9व्या वर्षी मृत्यू ओढवला. प्राणी दत्तक योजनेत "तेजस'ला केदार कासार या उद्योजकाने वर्षभरासाठी दत्तक घेतले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tejas lion passed away from Rajiv Gandhi national park Pune