टेमघर धरण होणार भूकंपरोधक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

प्रकल्पाची साठवण क्षमता ३.७१ टीएमसी 
धरण दुरुस्तीचे काम २०१७ मध्ये हाती घेण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यानंतर सरकारने २०१९ मध्ये हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास परवानगी दिली. त्यानुसार टेमघर धरण १०० टक्के भरण्यात आले. टेमघर धरणाची क्षमता ३.७१ टीएमसी इतकी आहे. धरण सध्या पूर्ण क्षमतेचे भरल्याने शहराला यंदा एक टीएमसी जादा पाणी उपलब्ध झाले.

पुणे - खडकवासला धरण साखळीतील टेमघर धरण भूकंप क्षेत्राच्या झोन तीनमध्ये येते. यामुळे धरण दुरुस्तीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीने धरणाचे काम भूकंपरोधक करण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (सीडब्लूपीआरएस) या संस्थेला दिल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेल्या टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर मजबुतीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. हे धरण मागील महिन्यात रिकामे करण्यात आले. दुरुस्तीअंतर्गत ग्राउंटिंगचे काम ९० टक्के, तर धरणाच्या आतील बाजूच्या भिंतीचे अस्तरीकरणाचे काम तीस टक्के पूर्ण झाले आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीमध्ये या सूचना देण्यात आल्या आहेत.

आम्ही करू शरद पवारांचे संरक्षण - महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम

टेमघर धरणाचे काम ११९७ मध्ये सुरू करण्यात आले. त्या वेळी धरण सुरक्षिततेच्या १९८४ च्या निकषानुसार काम करण्यात आले. मात्र त्यानंतर २०१५ मध्ये धरण सुरक्षिततेचे नवे निकष लागू करण्यात आले. त्यानुसार धरणाच्या मजबुतीकरणाचे काम करणे आवश्‍यक आहे. टेमघर धरण परिसर भूकंप क्षेत्राच्या झोन तीनमध्ये येत आहे. त्यामुळे गळती रोखण्याबरोबरच धरण भूकंपरोधक असणेही आवश्‍यक आहे. या पार्श्‍वभूमीवर समितीने धरणाच्या मजबुतीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बांधकामानंतर तीन वर्षांत गळती
टेमघर धरणाचे काम २०१० मध्ये पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली. मात्र त्यानंतर अवघ्या दोन-तीन वर्षांत या धरणातून गळती सुरू झाली. २०१६ मध्ये धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. पाणी गळतीचे प्रमाण प्रति सेंकद २ हजार ५८७ लिटर एवढे होते. त्यामुळे हा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. परिणामी हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास सरकारने मान्यता दिली नव्हती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temghur Dam will be earthquake resistant