तापमानाचा पारा उतरला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

पुणे - शहरात पस्तीशीपर्यंत वाढलेला कमाल तापमानाचा पारा अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये 29.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. पुण्यातील कमाल तापमान शुक्रवारी 29.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे राज्यातील सर्वांत नीचांकी कमाल तापमान ठरले आहे.

पुणे - शहरात पस्तीशीपर्यंत वाढलेला कमाल तापमानाचा पारा अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये 29.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. पुण्यातील कमाल तापमान शुक्रवारी 29.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे राज्यातील सर्वांत नीचांकी कमाल तापमान ठरले आहे.

उत्तर भारतात "वेस्टर्न डिस्टर्बन्स' असल्याने तेथे पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. याचा प्रभाव दक्षिणेपर्यंत झाला आहे. त्यामुळे विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडला. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. प्रमुख शहरांतील कमाल तापमानाचा पारा उतरला आहे.

पुण्यात 5.3 अंश सेल्सिअसने कमाल तापमानाचा पारा घसरला. त्यामुळे दिवसा असणारा उन्हाचा चटका कमी झाला असून, संध्याकाळी गार वारे वाहत होते. तसेच किमान तापमानातही घट होऊन पारा 2.6 अंश सेल्सिअसने कमी होऊन 12.1 अंश सेल्सिअस नोंदला गेला.

राज्यातील चंद्रपूर येथे सर्वाधिक 36.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली, तर महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. शनिवारपासून राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

कर्नाटकाचा उत्तर भाग आणि तेलंगणच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तेलंगण, कर्नाटकचा उत्तर भाग ते तमिळनाडूच्या दक्षिण भागादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याचे चक्राकार स्थितीमध्ये रूपांतर होण्याची शक्‍यता आहे. उत्तर छत्तीसगडच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात हलका ते जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता आहे. गेल्या चोवीस तासांत विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते.

सरासरीत घट
मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली; तर कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. विदर्भाच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित भागांत तापमान सरासरीच्या जवळपास होते.

Web Title: temperature decrease in pune