अतिनील किरणे धोकादायक पातळीवर (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

कमाल तापमानाची नोंद करताना थर्मामीटरवर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घेतली जाते. थर्मामीटर लाकडी पेटीत ठेवलेला असतो. हवा खेळती राहण्यासाठी त्या पेटीत जागा ठेवलेली असते. त्यामुळे हवेतील तापमानाची अचूक नोंद होते.
- रघुनाथ कारखेले, हवामानतज्ज्ञ

पुणे - तुम्ही गुरुवारी भरदुपारी अडीच वाजता रस्त्यावर होता? जर असाल तर त्या वेळी चालताना पायाजवळ तुम्हाला प्रचंड उष्णता जाणवली असेल. कारण भरदुपारी जमिनीलगत तापमान ६३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. त्याच वेळी जमिनीपासून चार फुटांवर ३९.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले जात होते.

संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत दिवसभरातील कमाल तापमान ४०.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे होत असतानाच शहरात अतिनील किरणांनीही धोक्‍याची पातळी ओलांडल्याचे दिसून आले.

तुमच्या मोबाईलवर दिसणाऱ्या तापमानाप्रमाणेच बाहेरचे तापमान असेल असे निश्‍चित नाही. एक अंदाज घेण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण, तापमान नेमके कसे मोजावे हे जागतिक हवामान संघटनेने ठरवून दिले आहे.

आपल्या पुण्यात कृषी महाविद्यायाच्या परिसरातील भारतीय हवामान खात्यातर्फे वातावरणातील निरीक्षणे नोंदविली जातात. जगभरात एकाच वेळी हे तापमान मोजले जाते. दुपारी अडीच वाजता या ठिकाणी घेतलेल्या नोंदीनुसार जमिनीलगतचे तापमान ६३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

जमिनीलगत का वाढते तापमान?
सूर्याची किरणे थेट जमिनीवर असल्याने जमीन सर्वाधिक तापते. त्यानंतर हळूहळू हवेच्या वरच्या स्तरातील तापमान वाढू लागते. जमिनीपासून १२० सेंटिमीटरवर (सुमारे ४ फूट) अंतरावरील तापमान कमाल तापमान म्हणून नोंदले जाते.

अतिनील किरणांचा निर्देशांक ७.४ वर
पुण्यात अतिनील किरणांच्या निर्देशांकाने गुरुवारी दुपारी अडीच वाजता यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच धोक्‍याची पातळी ओलांडली. आतापर्यंत ३.७ पर्यंत नोंद होणाऱ्या अतिनील किरणांच्या निर्देशांकाने गुरुवारी ७.४ पर्यंत उसळी मारली असल्याची माहिती भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेच्या (आयआयटीएम) ‘सफर’या हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या प्रकल्पाने दिली आहे. पुण्यात अतिनील किरणे धोक्‍याच्या पातळीवर असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला ‘आयआयटीएम’ने दिला आहे. अशा वेळी सूर्याची किरणे थेट शरीरावर पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. 

Web Title: Temperature Summer Heat Rays