निवडणुकीसाठी दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने, तसेच मतदान शांततेत पार पाडण्यासाठी शहर पोलिस दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे दहा हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येत असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्‍त श्रीकांत पाठक यांनी दिली. 

पुणे - महापालिका निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने, तसेच मतदान शांततेत पार पाडण्यासाठी शहर पोलिस दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे दहा हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येत असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्‍त श्रीकांत पाठक यांनी दिली. 

यंदाच्या महापालिका निवडणुकीत तुलनेने मतदान केंद्र आणि मतदारांची संख्या वाढली आहे. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात 41 प्रभाग असून, 879 मतदान केंद्रे आणि तीन हजार 132 बूथ आहेत; तर पिंपरी-चिंचवड परिसरात 32 प्रभाग असून, 488 मतदान केंद्रे आणि एक हजार 578 बूथ आहेत. तसेच, पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत जिल्हा परिषदेच्या मतदानासाठी 280 बूथ निश्‍चित करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी शनिवारपासून पोलिस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त, पोलिस उपायुक्‍त, सहायक आयुक्‍त, पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात राहतील. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या पाच कंपन्या, दंगल नियंत्रण पथकाच्या चार टीम, बॉंबशोधक व नाशक पथकाच्या सहा टीम, शीघ्रकृती दलाच्या (क्‍यूआरटी) चार टीमची मदत घेण्यात येणार आहे. सहायक आयुक्‍त आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी स्ट्रायकिंग फोर्स देण्यात येणार आहे. यासोबतच भरारी पथके तैनात करण्यात आल्याचे उपायुक्‍त पाठक यांनी सांगितले. 

संवेदनशील केंद्र 
संवेदनशील मतदान केंद्रांवर आणि एकाच इमारतीमध्ये पाचपेक्षा जास्त बूथ असलेली 378 ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी एक सहायक निरीक्षक आणि दोन कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. 

असा राहील बंदोबस्त- 
अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त - 2 
पोलिस उपायुक्‍त - 11 
सहायक आयुक्‍त - 42 
पोलिस निरीक्षक - 174 
सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक - 537 
पोलिस कर्मचारी सात हजार - 837 
होमगार्ड - 500 
राज्य राखीव पोलिस दल - आठ कंपन्या (एकूण आठशे) 
दंगल नियंत्रण पथक चार टीम (48 कर्मचारी) 
क्‍यूआरटी - चार पथके 
बीडीडीएस - सहा पथके 

Web Title: Ten thousand police arrangements for the elections