बोरीपार्धीत विद्यार्थ्यांनी बनविले 10 हजार सिडबॅाल्स

रमेश वत्रे
शुक्रवार, 20 जुलै 2018

'एक मित्र'च्या सदस्या डॅा. तनुजा अवचट यांनी प्रारंभी महिलांना पर्यावरणाचे महत्व पटवून सांगितले. विद्यार्थी व महिलांना विविध झाडांच्या बिया गोळा करण्यास सांगितल्या.

केडगाव - बोरीपार्धी (ता. दौंड) येथील समाजसेवक शिवाजीराव जेधे विद्यालयातील चिमुकल्यांनी 10 हजार सीड बॉल्स तयार करून ते लगतच्या वन विभागात ठेऊन दिले आहेत. एक मित्र एक वृक्षच्या महिला विभागाने या उपक्रमाचे संयोजन केले. दौंड तालुक्यात एवढया मोठया प्रमाणात सीड बॅाल तयार करण्याचा हा पहिला प्रयोग आहे. 

'एक मित्र'च्या सदस्या डॅा. तनुजा अवचट यांनी प्रारंभी महिलांना पर्यावरणाचे महत्व पटवून सांगितले. विद्यार्थी व महिलांना विविध झाडांच्या बिया गोळा करण्यास सांगितल्या. महिला व विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या आसपास मिळालेल्या चिंच, कडुनिंब, करंज, कांचन, फणस, बहावा, आंबा, जांभुळ, सीताफळ यांच्या सुमारे 25 हजार बिया गोळा केल्या. या उपक्रमात विद्यालयातील सातवी ते नववीचे 250 विद्यार्थी सहभागी झाले. गायीचे शेण व चिखलाचा गोळा तयार करून त्यात दोन बिया ठेवण्यात आल्या. या गोळ्यालाच सीड बॅाल म्हणतात. विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहात सीड बॅाल बनविले. 

तालुका वनाधिकारी महादेव हजारे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, हा उपक्रम प्रत्येक शाळेने राबवावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. शाळा या उपक्रमात उतरल्या तर यातून फार मोठे काम उभे राहू शकते. सीडबॅालमधून तयार झालेले रोपांची उत्पत्ती सशक्त असल्याने ते नैसर्गिकरित्या चांगले वाढतात. डॅा.अवचट म्हणाल्या, पर्यावरण संरक्षणासाठी महिलांनीही पुढे येण्याची गरज आहे. सीड बॅाल उपक्रमातून अत्यंत कमी खर्चात वृक्षलागवडीचे मोठे उद्दीष्ठ गाठता येते. एक मित्रचे प्रशांत मुथा म्हणाले की, विद्यार्थ्यांना पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम हाती घेतला.  वनविभागाची परवानगी घेऊन ते सीड ठेवण्यात आले आहेत. या वेळी प्राचार्या नीलम ससाणे, निता टेंगले, मनिषा नवले, सीमा महाशब्दे, सारिका भोसले, सुरेखा कचरे, अंजली लोणकर, प्रज्ञा पाठक, शुभांगी बारवकर यांनी विद्यार्थ्यांना बॅाल बनविण्यास मदत केली. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Ten Thousand students made seedballs in boripardhi kedgaon