
बारामतीत खाजगी व सरकारी यंत्रणेवरील ताण झाला असह्य.....
बारामती - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अस्वस्थता वाढू लागली आहे. सरकारी व खाजगी दोन्ही रुग्णालयांवरचा ताण वाढू लागल्याने यंत्रणेवरचा ताण वाढू लागल्याचे समोर येत आहे. बारामतीत गेल्या काही दिवसात तपासण्यांची संख्या लक्षणीय वाढली, त्या मुळे कोरोना पॉझिटीव्ह येणा-यांचीही संख्या वेगाने वाढली. गेल्या काही दिवसात बारामती शहर व तालुका मिळून तीनशेहून अधिक रुग्ण दररोज पॉझिटीव्ह आढळत आहेत.
रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर तपासण्यांसाठी रुग्णांची विविध खाजगी व सरकारी रुग्णालयात गर्दी होते, एक्सरे, एचआरसीटी स्कॅनसह रुग्णालयात दाखल होण्यासाठीची धावपळ आणि स्कोर खराब असेल तर मग रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी पळापळ सुरु होते. या सगळ्यात आता खाजगी आणि सरकारी दोन्ही रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका व इतर कर्मचारी यांच्यावरचा ताण आता कमालीचा वाढला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना समजावताना व त्यांना शांत करताना रुग्णालयाच्या डॉक्टर्सची पार दमछाक होते आहे.
हेही वाचा: भिगवणला कोरोना रुग्नांसाठी दोन दिवसात पन्नास ऑक्सिजन बेड सुविधा
दुसरीकडे अनेक रुग्णालयातील परिचारिका व कर्मचारीही कामाच्या ताणामुळे सुटी घेण्यापासून ते कामच सोडून जाण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. रुग्णालयातील क्षमता संपूर्ण वापरुन अतिरिक्त रुग्णांवर उपचाराचे शिवधनुष्य पेलताना आता यंत्रणा कोलमडणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच राजकीय पदाधिका-यांपासून ते अनेक सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांचे फोनवर फोन येत असल्यानेही रुग्णालय व्यवस्थापनातील प्रमुख हवालदिल झाले आहेत.
प्रत्येकाचेच समाधान करणे अशक्य असल्याने या यंत्रणेवरही दबाव वाढत चालल्याचे चित्र आज बारामतीत निर्माण झाले आहे. कामाचा ताण असह्य होऊ लागल्याची व्यथा आज काही वैद्यकीय व्यावसायिकांनी नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर बोलून दाखवली. खाजगी रुग्णालयेही आपल्या परिने रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी जे काही शक्य आहे ते करण्याचा मनापासून प्रयत्न करीत आहेत, काही चुकीच्या बाबी घडल्याही असतील पण सर्वांनाच एकच न्याय लावणे व डॉक्टरांवरच अपयशाचे खापर फोडणे योग्य नाही, अशी भावना त्यांनी मांडली. बारामतीत कोरोनाबाबत ज्या घडामोडी घडत आहेत, ज्या निर्णयप्रक्रीयाहोत आहेत, त्यात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनाही सामावून घ्यायला हवे, त्यांच्या अडचणी व मतेही जाणून घेणे गरजेचे असल्याची भावना डॉक्टरांनी मांडली आहे.
Web Title: Tension Private And Government System In Baramati By
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..