दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या तयारीसाठी शाळांचा पुढाकार | Exam Preparation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Exam

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या तयारीसाठी शाळांचा पुढाकार

पुणे : ‘शाळा, महाविद्यालये बंद आणि ऑनलाइन शिक्षण (Online Education) सुरू ठेवा’, असा आदेश राज्य सरकारने काढला. मात्र, दहावी-बारावीच्या बोर्डाची परीक्षा तोंडावर असताना, पुन्हा शाळा बंद म्हटल्यावर शिक्षक, विद्यार्थी पालकांचा ‘टेन्शन’ वाढले. परंतु यातून मार्ग काढण्यासाठी आता शाळा पुढाकार घेत असल्याचे दिसून येते. शाळांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्याचा लेखन सराव, सराव परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा अशी तयारी सुरू ठेवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी करून घेणे शक्य होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. (Corona : Schools And Colleges Closed)

‘शाळा, महाविद्यालये बंद’ करण्याचा राज्य सरकारचा आदेश म्हटल्यावर शिक्षण संस्थांना त्यांची अंमलबजावणी करण्याचे बंधन आले. शाळा बंद ठेवण्यात आल्या आणि ऑनलाइन शिक्षण पुन्हा सुरू झाले. दरम्यान, प्रत्यक्ष शाळेत ८० ते ८५ टक्के उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांचा हजेरीपट ऑनलाइन वर्ग सुरू झाल्यावर २० ते ३० टक्क्यांपर्यंत घसरल्याचे निरीक्षणही शिक्षकांनी नोंदविले आहे.

हेही वाचा: बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

शाळांमध्ये सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात येत आहे. मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले म्हणाले,‘‘विविध शैक्षणिक बोर्डांकडून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम सुरू राहतील, असे राज्य सरकारच्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा लेखनाचा कमी झालेला सराव भरून काढण्यासाठी शाळांमध्ये पूर्व परीक्षा, सराव परीक्षा आयोजित केल्या जात आहेत. तसेच लेखनातील दोष विद्यार्थ्यांना सांगून योग्य मार्गदर्शन केले जात आहे. त्यासोबत वर्षभरातील प्रयोग, नोंदवह्या, स्वाध्याय, प्रकल्प, अंतर्गत मूल्यमापनाशी निगडित कामकाज शाळांमध्ये सुरू आहे.’’

सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यावर भर

‘‘प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी दररोज मोठ्या उत्साहाने शाळेत हजेरी लावत होते. आता पुन्हा ऑनलाइन वर्ग सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढले आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडला आहे. सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सराव प्रश्नपत्रिका दिल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यात येत आहे. दहावी-बारावीचे विद्यार्थी किमान परीक्षेमुळे अभ्यासात लक्ष घालत आहेत. परंतु शाळा बंदमुळे इयत्ता पाहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.’’

- एकनाथ बुरसे, मुख्याध्यापक, एच. ए. हायस्कूल, पिंपरी

हेही वाचा: कोरोनाच्या लशीने पॅरालिसीस झाला बरा

किमान दहावी-बारावीचे वर्ग सुरू करावेत

‘‘राज्यात लाखो विद्यार्थी सध्या दहावी-बारावीच्या परीक्षेची तयारी करत आहेत. संपूर्ण वर्ष ऑनलाइन शाळेनंतर आता कुठे नियमित वर्ग सुरू झाले होते, त्याला पुन्हा ‘ब्रेक’ लागला. काही शाळांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करण्याची लगबग होती, परंतु काही शाळांनी सराव परीक्षा सुरू केल्या आहेत. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या त्यावेळी विद्यार्थ्यांची हजेरी ८० ते ८५ टक्के इतकी होती. परंतु ऑनलाइन वर्गात केवळ ३० ते ३५ टक्के विद्यार्थी हजर राहत आहेत. त्यातही सातत्य नसल्याचे निदर्शनास येते.’’

- सुजित जगताप, सचिव, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ

‘‘ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा पाहता, शाळा सुरू करणे गरजेचे आहे. तरच सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचू शकणार आहे. शाळा बंद असल्यामुळे विशेषत: झोपडपट्टी, वस्त्यांमधील मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडण्याची भीती आहे. त्यामुळे पालकांकडूनच शाळा सुरू करण्याची आग्रही मागणी होत आहे. दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे.’’

- डॉ. अनिता साळुंके, मुख्याध्यापिका, डॉ. आंबेडकर मेमोरियल टेक्निकल हायस्कूल, पुणे कॅन्टोमेंट

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newseducation
loading image
go to top