चव व स्वच्छतेनुसार हॉटेलना "हायजिन रेटिंग'

योगीराज प्रभुणे
गुरुवार, 21 जून 2018

पुणे - आपण सध्या कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेथील अन्न पदार्थांची चव, स्वच्छता, टापटीप हे ढोबळ निकष वापरून आपण ते हॉटेल चांगले किंवा वाईट म्हणतो; पण आता याच निकषांची काटेकोर तपासणी करून "हायजिन रेटिंग' असे प्रमाणपत्र खुद्द "भारतीय अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण' (एफएसएसएआय) देणार आहे. याचा देशातील पहिला प्रयोग महाराष्ट्रात सुरू झाला आहे.

पुणे - आपण सध्या कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेथील अन्न पदार्थांची चव, स्वच्छता, टापटीप हे ढोबळ निकष वापरून आपण ते हॉटेल चांगले किंवा वाईट म्हणतो; पण आता याच निकषांची काटेकोर तपासणी करून "हायजिन रेटिंग' असे प्रमाणपत्र खुद्द "भारतीय अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण' (एफएसएसएआय) देणार आहे. याचा देशातील पहिला प्रयोग महाराष्ट्रात सुरू झाला आहे.

आपण जात असलेल्या हॉटेलमधील खाद्य पदार्थ नेमक्‍या कोणत्या दर्जाचे आहेत, हे आत्तापर्यंत ग्राहक म्हणून आपल्याला कधीच कळत नव्हते. तशी कोणतीच यंत्रणाही अस्तित्वात नव्हती. हॉटेलचा परिसर, त्यातील साफसफाई, तेथे काम करणाऱ्या कामागारांची टापटीप यावरून आपण त्याच्या गुणवत्तेचे जुजबी मोजमाप करत होतो. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात हॉटेलचे काटेकोर तपासणी करून त्याला "हायजिन रेटिंग' देण्याचा देशातील पहिला प्रयोग महाराष्ट्रात सुरू झाला आहे. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात पुण्यासह मुंबई आणि नागपूर येथील 30 तारांकित हॉटेलची तपासणी करून त्याला रेटिंग देण्यात आले आहेत. पुण्यातील 10 पैकी 9 हॉटेलला "सर्वोत्तम' दर्जा मिळाला असून, एकाचा "चांगल्या'मध्ये झाला आहे. मुंबई आणि नागपूरमधील बहुतांश हॉटेलला "सर्वोत्तम' मानांकन मिळाले आहे.

तपासणीचे निकष
- कच्च्या मालापासून ते अन्न पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया तपासणार
- ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची पद्धत बघणार
- हॉटेलमधील पाण्याचे नमुने तपासणार
- पेस्ट कंट्रोलची पद्धत बारकाईने बघणार
- सांडपाणी व्यवस्थेची पाहणी करणार
- कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणीचे अहवाल पाहणार

अशी होईल प्रक्रिया
"हायजिन रेटिंग'च्या सुरवातीच्या टप्प्यात हॉटेलने स्वतः पुढाकार घेणे आवश्‍यक होते. त्याअंतर्गत राज्यातील 30 हॉटेलचे रेटिंग करण्यात आले. यापुढे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील चांगल्या दर्जाची वीस हॉटेल निवडून त्यांना या प्रक्रियेत आणले जाणार आहे. त्यानुसार सुरवातीला तपासणी केली जाईल. त्यात "हायजिन रेटिंग' प्रक्रियेत सुधारणा सुचविल्या जातील. त्या सुधारणा करून हॉटेल व्यवस्थापनाने स्वतः सुरवातीला दिलेल्या निकषांच्या आधारे मूल्यांकन करायचे आहे. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी पडताळणी करतील. त्यानंतर हॉटेलला "हायजिन रेटिंग' दिले जाईल.

असे आहे "हायजिन रेटिंग'
80 ते 100 सर्वोत्तम
60 ते 80 चांगले
40 ते 60 बरे
20 ते 40 सुधारण्याची गरज
0 ते 20 निकृष्ट

'आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक 20 रेस्टॉरंटला "हायजिन रेटिंग'च्या प्रक्रियेत आणण्याच्या सूचना अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार येत्या ऑगस्टअखेरपर्यंत पुणे विभागातील सुमारे एक हजार हॉटेल या प्रक्रियेत येतील,''
- शिवाजी देसाई, सहआयुक्त, पुणे विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग

'हॉटेलची गुणवत्ता वाढविणे हा "हायजिन रेटिंग'चा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी पुढील दोन महिन्यांत राज्यातील चार हजार हॉटेलची तपासणी करण्यात येईल. त्रुटी निघालेल्या हॉटेलला यातून सुधारण्याची संधी मिळेल. त्यातून त्यांची गुणवत्ता उंचावेल.
- चंद्रशेखर साळुंखे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, मुख्यालय, मुंबई.

Web Title: test cleaning hotel hygiene rating