Pune Crime : आयुक्त तुकाराम सुपेंची साडेतीन कोटींची मालमत्ता जप्त

टीईटी गैरव्यवहार प्रकरण; बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तीन शिक्षणाधिकाऱ्यांवर ‘एसीबी’कडून गुन्हे दाखल
Tukaram Supe
Tukaram SupeSakal

पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांची दोन कोटी ८८ लाखांची रोकड आणि १४५ तोळे सोन्याचे दागिने, अशी तीन कोटी ६० लाखांची मालमत्ता लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने जप्त केली.

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सुपे यांच्यासह सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि सांगलीचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तुकाराम नामदेव सुपे (वय ५९, रा. पिंपळे गुरव, पुणे) यांच्याविरुद्ध बुधवारी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुणे जिल्हा परिषदेत माध्यमिक विभागात शिक्षणाधिकारी पदावर सुपे कार्यरत होते. परीक्षा परिषदेचे आयुक्त असताना २०१९-२० मध्ये शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहार समोर आला. या प्रकरणी सुपे यांच्याविरुद्ध पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

चौकशीदरम्यान सुपे यांच्याकडे लाखोंची रोकड आणि टीईटी परीक्षेसंदर्भातील कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली होती. या गुन्ह्यात त्यांना १६ डिसेंबरला अटक झाली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने सुपे यांना निलंबित केले होते.

सुपे यांनी १९८६ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत भ्रष्ट मार्गाने मालमत्ता जमविल्याचे चौकशीत समोर आले आहे. या जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये दोन कोटी ८८ लाखांची रोकड आणि ७२ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.

आणखी दोन अधिकाऱ्यांकडे बेहिशेबी मालमत्ता-

शिक्षण विभागातील आणखी दोन अधिकाऱ्यांनी वैध उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पाच कोटी ८६ लाख रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण आनंद लोहार (वय ५०) यांच्याविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लोहार यांना मदत केल्याप्रकरणी त्यांची पत्नी सुजाता आणि मुलगा निखिल यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

तसेच, सांगलीचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे (वय ५९) आणि त्यांची पत्नी जयश्री यांच्याकडे ८३ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. त्यांच्याविरुद्ध सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com