ठाकरवाडी उजळली सौरदिव्यांनी!

Solar-Power
Solar-Power

चास - आदर्श गाव होण्याच्या दृष्टीने कान्हेवाडीने (ता. खेड) आणखी एक पाऊल टाकले आहे. राज्य सरकारच्या आदर्श गाव योजनेचे कार्यकारी संचालक पोपटराव पवार यांनी गावाला भेट दिल्यानंतर विकासाचा वेग वाढला आहे. गावापासून साडेपाच किलोमीटर डोंगरावर वसलेली ठाकरवाडी सौरऊर्जेने उजळली असून पाणीपुरवठ्यासाठीही सौरपंप बसविण्यात येत आहे. 

ठाकरवाडी हे सुमारे पन्नास ते पंचावन्न घरांचे तर दोनशे ते अडीचशे लोकवस्तीचे गाव. रस्ते, पाणी आणि वीज यापासून वंचित असणाऱ्या या गावात जिल्हा परिषदेची शाळा व अंगणवाडी मात्र उत्तम पद्धतीने सुरू आहे. मुंबई माता बाल संगोपन संस्थेचे सेक्रेटरी डॉ. माधव साठे यांची भेट ठाकरवाडीची कायापालट करणारी ठरली. सरपंच गंगूबाई आंबेकर, उपसरपंच मारुती सहाणे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक नीलेश पांडे, उद्योजक दिलीप आंबेकर यांच्याशी चर्चा करून त्यांनी थेमिस मेडिकल कंपनीकडून सीएसआर निधी मिळवून पाण्याची अडचण सोडविण्यासाठी विहीर बांधली.

मुंबई माता बाल संगोपन संस्थेने पाण्याचे नळ व टाक्‍या उपलब्ध केल्या, ग्रामस्थांनी श्रमदानाने पाइपलाइनसाठी खोदाई करून टाक्‍या बसविल्या. मात्र, विजेची अडचणी होती. विजेच्या प्रश्नाबाबत थेमिस कंपनीने शेततळ्यावर सौरपॅनेल बसविण्याची तयारी दाखवली व तत्काळ कामही सुरू झाले. सौरपंपासाठी ग्रामसहभागातून मिळालेल्या रकमेतून सोलर पंप उपलब्ध करण्यात आला. ठाकरवाडीची पाण्याची समस्या लवकरच सुटणार आहे.

कंपन्या, रोटरीची मदत
विजेसाठी प्रत्येक घरावर सोलर बसविण्याचा निर्णय झाला. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांच्यासाठी चंद्रकांत सहाणे यांच्या माध्यमातून चिंचवड येथील एचवायटी कंपनीने काही आर्थिक भार उचलण्याची तयारी दाखविली. त्यानंतर सर्व घरांवर सोलर पॅनेल बसविण्यात आले. दत्तात्रेय रूके यांच्या प्रयत्नांतून रोटरी क्‍लबने सोलर दिवे बसविले. जिल्हा परिषद शाळाही सौरऊर्जेने उजळली. मुंबई माता बाल संगोपन संस्थेच्या मदतीने दिवाळीत संपूर्ण गावात रंगरंगोटी करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com