स्क्रीन टाइम

स्क्रीन टाइम
Published on

स्क्रीन टाइम
----------
गडबड-गोंधळ आणि धमाल!
----------
दॅट्स सो रेव्हन (२००३)
----------
गेल्या आठवड्यात आपण ‘लिझी मॅग्वायर’ या मालिकेसंबंधी जाणून घेतले होते. तुमच्या काका-मावशीच्या किंवा आई-बाबांच्या पिढीची- अर्थात ‘मिलेनियल्स’ची ती एक आवडती मालिका होती. आपली आजची मालिकाही एका नायिकेभोवतीच गुंफलेली आहे- ‘दॅट्स सो रेव्हन’. त्यातही ‘टीनएजर्स’चेच जग आहे. ‘मिलेनियल्स’ची पसंती मिळालेली ही मालिका तुम्हाला नक्की आवडेल.
----------
मालिकेची गोष्ट
१४ वर्षांची रेव्हन बॅक्स्टर ही अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये राहणारी मुलगी असते. तिला मोठी होऊन ‘फॅशन डिझायनर’ व्हायचे असते. तिचे बाबा शेफ असतात आणि त्यांचे स्वत:चे छोटे उपाहारगृह असते. रेव्हनला कोरी नामक लहान भाऊ असतो आणि त्यांची सारखी भांडणे होत असतात. नुकत्याच ‘टीनएज’मध्ये पाऊल ठेवलेल्या रेव्हनचे चेल्सी आणि एडी हे ‘बेस्ट फ्रेंड्स’ असतात. चेल्सीला पर्यावरणाचे प्रेम असते, तर एडीला मोठी होऊन ‘रॅपर’ व्हायचे असते. पण हे तिघेही शाळेत ‘लोकप्रिय’ नसतात. अनेकदा ते कोणत्या ना कोणत्या अडचणींत सापडत असतात किंवा त्यांची फजिती होत असते. या मालिकेचा केंद्रबिंदू म्हणजे रेव्हनकडे असलेली आगळीवेगळी शक्ती! रेव्हनला चक्क भविष्य दिसत असते. पण या शक्तीच्या संदर्भात एक मेख असते. नजिकच्या भविष्यात काय घडणार आहे, त्यातील एखादा प्रसंग रेव्हनला अचानक दिसत असतो. पण त्याच्या मागे-पुढे काय घडले हे माहिती नसल्यामुळे तिला त्याची संगती लावता येत नसते. अनेकदा तिला जे खात्रीने घडणार असे वाटते, ते घडतच नाही आणि तिच्याबरोबर इतरांचाही गोंधळ उडतो. या मालिकेचे ४ सीझन्स व १०० एपिसोड्स आहेत. मालिकेच्या प्रत्येक भागात वेगळा गोंधळ आणि त्यातून घडणारी मजा आहे. एकसंध कथा नसल्यामुळे ही मालिका कोणत्याही भागापासून पाहायला सुरूवात करता येते. रेव्हन आणि तिचे मित्र १६-१७ वर्षांचे होईपर्यंतचा प्रवास या मालिकेत आहे. ही मालिका ‘जिओ हॉटस्टार’वर उपलब्ध आहे.

मालिकेची वैशिष्ट्ये
१९८०, ९० आणि २००० या तीन दशकांचा काळ विनोदी इंग्लिश मालिकांच्या दृष्टिने सुवर्णकाळच मानला जातो. ‘दॅट्स सो रेव्हन’ मालिकेतून रेव्हन सिमॉन ही उत्तम अभिनेत्री सगळ्यांच्या ओळखीची झाली. या मालिकेचे शीर्षकगीतही लोकप्रिय झाले होते. या कथेतील रेव्हनचा भाऊ- ‘कोरी’ ही व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली आणि २००७-०८ मध्ये त्या व्यक्तिरेखेची ‘कोरी इन द हाउस’ या नावाने वेगळी मालिका प्रदर्शित झाली.

आपण काय शिकतो?
- भविष्यातील एखादा प्रसंग पाहिल्यावर रेव्हन अस्वस्थ होते आणि सगळे काही सुरळीतच घडावे यासाठी आटोकाट प्रयत्न करते. पण अनेकदा जे व्हायचे ते होतेच! ‘थोडा धीर धरा आणि येणाऱ्या संकटाचा शांतपणे सामना करा,’ हा सुप्त संदेश या गोष्टींमध्ये आहे.
- आपल्या प्रत्येक कृतीचे काही तरी परिणाम असतात, हे रेव्हन शिकतेच, पण केलेल्या चुकीची जबाबदारी घ्यायलाही शिकते.
- ‘इतरांसारखे’ व्हायचे म्हणून अनावश्‍यक बदल करू नका, अशा गोष्टींपासून कृष्णवर्णीय लोकांबाबतच्या भेदभावापर्यंतचे अनेक विषय रेव्हनच्या गोष्टींमध्ये येतात.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com