खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून होत असलेल्या लूटीने दिवाळीचा आनंदच हिरावला | PUNE | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हडपसर : एसटी बंद असल्याने येथील थांब्यावर खासगी प्रवासी वाहनांचा राबता मोठ्याप्रमाणात वाढला आहे.

खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून होत असलेल्या लूटीने आनंदच हिरावला

हडपसर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या या लूटीने गावाकडे जाणाऱ्या सर्वसामान्य चाकरमान्यांच्या दिवाळीच्या आनंदावर मात्र चांगलेच विरजण पडले. त्यांनी बसविलेले दिवाळी खर्चाचे बजेट प्रवास खर्चामुळे बिघडल्याने त्यांच्या चेहऱ्यावर केवळ मनस्तापच पाहायला मिळाला.

हेही वाचा: "कॉरिडॉर'मुळे मुंबईकरांवर वीज वितरणाचा 8 हजार कोटींचा भार!  महापारेषण देणार नियामक आयोगाला प्रस्ताव 

हडपसर परिसरात पूर्वेकडील सोलापूर-बार्शी, उस्मानाबाद, लातूर या भागातील नागरिक मोठ्याप्रमाणात मोलमजुरी व नोकरी धंद्याच्या निमित्ताने वसलेले आहेत. विविध सणावाराला विशेषतः दिवाळसणाला व उन्हाळी सुट्टीत ही कुटुंबे नियमित गावाकडे जात असतात. दोन वर्षे कोरोनामुळे त्यांना हा आनंद घेता आला नव्हता. यावर्षी कोरोनाचे सावट निवळल्याने व निर्बंध शिथिल झाल्याने गावाकडे जाण्यासाठी ही मंडळी असुसली होती. त्यामुळे येथील एसटी थांब्यावर दरवर्षीच्या तुलनेत मोठी गर्दी दिसत होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांना खासगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागला. मात्र, या वाहतूकदारांकडून प्रवाशांच्या असहायतेचा फायदा उठवत दुपटीपेक्षाही जादा भाडे आकारले जात आहे. त्यामुळे या सर्वसामान्य मजूर व चाकरमान्यांना दिवाळीचा आनंद जेमतेमच घ्यावा लागला.

सध्या सोलापूर रस्त्यावर रविदर्शन एसटी थांबा ते शेवाळेवाडी फाट्यापर्यंत शेकडो प्रवासी वाहनांची वाट पाहत उभे राहिलेले दिसतात. लहानमोठी अनेक प्रवासी वाहनेही संपूर्ण महामार्गावर उभी राहिलेली असतात. वाहतूक नियंत्रण करणारी पोलीस व्हँन येताच ही वाहने थोडी मागेपुढे करतात. पोलिसांनाही दाद न देताना ते दिसतात. रविदर्शन चौकातील सेवा रस्त्यावर ही वाहने सर्रासपणे उभी राहत आहेत.

हेही वाचा: सांगली : एसटी वाहकाच्या मृत्यूने संसार उघड्यावर

"आम्ही पतीपत्नी येथे मजूरीचे काम करतो. गावाला जाण्यासाठी पैशांची तजवीज केलीईचा सगळा होती. मात्र, प्रवासालाच जास्त पैसे मोजावे लागत असल्याने खर्चाचे बजेटच बसले नाही. दिवाळीचा सगळा आनंदच त्यामुळे निघून गेला.'

- ईश्वर पाटील, प्रवासी

"मी बार्शीला जाण्यासाठी हडपसर, रविदर्शन येथील एसटी थांब्यावर एक तासापासून उभा आहे. खासगी वाहतूक करणाऱ्या मोटार गाडीचे अनेकजण विचारतात. मात्र, भाडे चारशे पाचशे रुपये सांगतात. त्यातील अनेकजण दारू प्यायलेले आहेत. शिवाय क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरतात. एसटीला हेच प्रवासभाडे दोनशे ऐंशी रूपये आहे.'

- भरत ताधे, प्रवासी

"खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसनेही भाडे वाढविले आहे. बराच वेळ ताटकळत थांबून आणि वाहनांमागे धावूनही बसायला जागा मिळत नाही. आता केंव्हा आणि कोणते वाहन मिळेल व किती पैसे द्यावे लागतील, हे सांगता येत नाही.'

- रूक्मिणी शिंदे, प्रवासी

loading image
go to top