esakal | न्हावऱ्यात होम क्वारंटाईन रुग्ण फिरताहेत मोकाट

बोलून बातमी शोधा

covid19
न्हावऱ्यात होम क्वारंटाईन रुग्ण फिरताहेत मोकाट
sakal_logo
By
प्रताप भोईटे

न्हावरे : शिरूर तालुक्यात न्हावरे परिसरात सौम्य लक्षणे असलेले होम क्वारंनटाईन रुग्ण नियमांचे पालन न करता मोकाट फिरत असल्याने संसर्गाचा धोका अधिक तीव्र होत आहे. ग्रामपंचायत प्रशासन अशा लोकांची नावे पोलिसांना कळवून संबंधिताना चाप बसवणार असल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी पी. बी. केदारी बोलताना दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील ग्रामपंचायत प्रशासन मोठ्या कसोशीने प्रयत्न करीत आहेत त्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता येथील ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी पंधरा दिवसांपासून व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला आहे, मात्र तरीही येथील कोरोना रूग्णांची साखळी तुटता तुटत नाही. सध्या गावठाण परिसरात ७० हुन अधिक अँक्टीव्ह रुग्णसंख्या आहे. येथे कोवीड सेंटर आहे पण ते हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे सौम्य लक्षणें असणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय अधिकारी घरीच राहून गोळ्या औषधे खा व होम क्वारंनटाईन रहा असा सल्ला देत आहेत. मात्र तरीही काही रुग्ण बाहेर फिरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली असून, होम क्वारनटाईन रुग्णांना कोण आवरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा: जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

रोज रुग्णसंख्या वाढत असल्याने बेड उपलब्ध होत नाहीत. बेड मिळाला तर ऑक्सिजन, प्लाझ्मा, रेमडेसिवीर टंचाईमुळे नातेवाईकांची धावपळ वाढली असून, उपचार करणारे डाँक्टरामधून चिंता व्यक्त होत आहे. वारंवार सूचना करून सुद्धा होम क्वारंनटाईन रुग्ण दूध, किराणा खरेदीचा बहाणा करून फिरत असतात. होम क्वारंनटाईन रुग्ण किंवा कोविड उपचार केंद्रात आठ दिवस उपचार घेऊन आलेल्या रुग्णांनी पुढील सात दिवस घरी विलगिकरण रहाणे आवश्यक आहे.

तसेच होम क्वारंनटाईन रुग्णांनी घरीच विलग राहून उपचार घेणे बंधनकारक आहे. मात्र होम क्वारंनटाईन असलेले व कोविड उपचार केंद्रातून सोडलेले रुग्ण फिरत असताना दिसतात. या रुग्णामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रात्र दिवस कोरोना रुग्णांसाठी झटत आहेत. मात्र कोरोना संसर्ग झालेला व लक्षणे नसलेला तरुण वर्ग फिरत असून संसर्ग वाढवत आहे. त्यामुळे यापुढे जर कोणी क्वारंनटाईन रुग्ण बाहेर फिरताना आढळून आला तर त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने पोलिसांना कळवली असा निर्णय न्हावरे ग्रामपंचायतीने घेतला असल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी केदारी यांनी दिली.

हेही वाचा: पुणे विद्यापीठाची प्रयोगशाळा अजूनही ‘निगेटिव्ह’